ठाण्यात दोन माकडांचा संशयास्पद मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 06:53 PM2020-12-07T18:53:03+5:302020-12-07T18:59:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : वागळे इस्टेट, रामनगर येथे दोन जंगली माकडांचा मृत्यु वीजेच्या धक्याने की अल्पवयीन मुलांच्या मारहाणीतून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वागळे इस्टेट, रामनगर येथे दोन जंगली माकडांचा मृत्यु वीजेच्या धक्याने की अल्पवयीन मुलांच्या मारहाणीतून झाला, याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. दोघांचेही मृतदेह परस्पर जंगलात पुरण्यात आले होते. ठाणेवनविभागाने ते काढून पुन्हा शवविच्छेदनासाठी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्याच्या वागळे इस्टेट रोड क्रमांक २८ येथील मॅक्स स्पेर कंपनीसमोर दोन जंगली माकडांचा विद्युत खांबावर चढल्याने वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानुसार या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेंव्हा त्या माकडांना तेथील स्थानिक अज्ञात मुलांनी जवळच्या डोंगरावर नेऊन दफन केल्याची माहिती समोर आली. ही माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी वनविभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दफन केलेल्या दोन्ही माकडांनार बाहेर काढून ठाण्यातील एसपीसीए या संस्थेच्या पशुवैद्यकीय रु ग्णालयात नेले. तपासणीत त्या माकडांना मारहाण झाल्याची प्राथमिक बाब समोर आली. त्यामुळे नेमकी या माकडांचा मृत्यु मारहाणीतून झाला की वीजेच्या धक्क्याने याचा तपास आता वनविभागाकडून करण्यात येत आहे. दोन्ही माकडांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी बोरिवली येथील वनविभागाच्या पशुवैद्यकीय
रु ग्णालयात करण्यात येणार आहे. या तपासणी अहवालानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य राहील असे वनविभागाने सांगितले.
‘‘रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यु झाला होता. त्यांना पुरलेही होते. परंतू त्यांना वीजेच्या धक्का लागल्याचे निशाण नव्हते. त्यामुळे मृत्युचे नेमकी कारण सांगता येणार नाही.’’
डॉ. संजय राणे, मानद पशुवैद्यक, एसपीसीए, ठाणे.
‘‘ घटनास्थळी जाण्यापूर्वीच दोन्ही माकडांना जमिनीत पुरले होते. मृत्युचे नेमकी कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल.’’
संजय पवार, वनपाल, ठाणे शहर
.........
* नर जातीच्या खांद्याला दुखापत
दोन्ही माकडे वानर जातीचे असून त्यातील एक नर तर दुसरे मादी आहे. नराच्या डाव्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती तपासणी करणाºया डॉक्टरांनी दिली.