एक संशयास्पद व्यक्ती अटकेत

By admin | Published: August 9, 2015 11:23 PM2015-08-09T23:23:28+5:302015-08-09T23:23:28+5:30

मुरुड तालुक्यातील वरची वावडुंगी परिसरात दिसून आलेल्या आठ संशयित व्यक्तींपैकी एकास ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे ताब्यात घेण्यात आले असून त्याचे नाव शिशुकुमार ढोले आहे.

A suspicious person detained | एक संशयास्पद व्यक्ती अटकेत

एक संशयास्पद व्यक्ती अटकेत

Next

आगरदांडा : मुरुड तालुक्यातील वरची वावडुंगी परिसरात दिसून आलेल्या आठ संशयित व्यक्तींपैकी एकास ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे ताब्यात घेण्यात आले असून त्याचे नाव शिशुकुमार ढोले आहे. तो आसाम राज्यातील माजुली जिल्ह्यातील शिशुगंरी- दारेगाव येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वावडुंगी व सायगाव परिसरात स्थानिक रहिवासी शादाब जमादार यांनी आठ संशयित व्यक्तींना पाहिले. त्यामध्ये दोन बंदूकधारी होते. ही माहिती मिळताच रायगड पोलिसांनी नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू केली. आठ संशयितांपैकी बंदूकधारी शिशुकुमार ढोले हा एक होता असे शादाब जमादार यांनी ओळखले आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक दिलीप शंकरवार यांनी सांगितले. या परिसरातील जंगलात शोध मोहीम सुरू आहे. यासाठी शीघ्रकृतीदल, पोलीस फौज आणि वनकर्मचारी यांच्यासह संपूर्ण वरची वावडुंगी गावाच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वावंडुगी वरचीवाडी येथील महिला प्रविणा मांडवकर यांनाही शनिवारी पहाटे जंगलात सरपण आणण्यासाठी जात असताना आठ जण गावाच्या जवळून जाताना दिसले होते. त्यातील दोघांजवळ खांद्याला बंदुका व तोंडावर रुमाल असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचबरोबर त्या गावातील मुलगा हा गुरे बघण्यासाठी गेला असता त्याला ही पाठमोरे बंदूकधारी दिसले.
माजी सरपंच अजित कासार यांनी त्वरित मुरुड पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. मुरुडचे उपनिरीक्षक सुदेश पालकर यांनी पोलीस ताफ्यासह व वनरक्षक पांडे यांनी शोधकार्य सुरु केले. घटनेचे गांभीर्य विचारात घेवून अलिबाग येथून कुमक मागविण्यात आली होती.
यावेळी आमदार पंडित पाटील यांनी वरचीवाडी वावडुंगी गावाला भेट देवून ग्रामस्थांशी संवाद साधला. संपूर्ण किनारपट्टीवर सुरक्षा चौक्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. निष्पन्न संशयित शिशुकुमार ढोले याची चौकशी सुरू असल्याचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक राजा पवार यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: A suspicious person detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.