केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ
By नितीन पंडित | Published: January 3, 2024 04:39 PM2024-01-03T16:39:55+5:302024-01-03T16:40:34+5:30
कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी भिवंडीतील अंजुर दिवे या गावात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला.
भिवंडी : भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालय, ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या माध्यमातून रेवदंडा येथील कै.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतीं मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी भिवंडीतील अंजुर दिवे या आपल्या स्वतःच्या गावात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिंनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसीलदार अधिक पाटील,गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे,माजी जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील यांसह अनेक शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी,ग्रामपंचायत पदाधिकारी,स्थानिक ग्रामस्थ शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते.
ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छता अभियान राबवून ठाणे ग्रामीण स्वच्छ सुंदर करण्याचा संकल्प नववर्षानिमित्त केला असल्याचे सांगत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी हा पथदर्शी कार्यक्रम यशस्वी करून त्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील २ लाख ६० ग्रामपंचायती व ६ लाख ४० हजार गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचा मानस आहे. ग्रामीण भागातील गाव पातळी पासून स्वच्छता अभियाना राबविल्यास खऱ्या अर्थाने देश विकसित होण्यास हातभार लागणार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.