ठाणे जिल्ह्यातील ४३१ गावांत बुधवारी 'स्वच्छतेचा जागर' अभियान; कपिल पाटील यांची माहिती
By सुरेश लोखंडे | Published: January 1, 2024 06:35 PM2024-01-01T18:35:43+5:302024-01-01T18:36:44+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ मध्ये भारताला विकसित राष्ट्र करण्याचे ध्येय ठेवले आहे. भारताचा मोठा भाग हा ग्रामीण आहे.
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिल्यांदा ठाणे जिल्ह्यातील ४३१ गावांंमध्ये बुधवारी स्वच्छतेचा पायलट प्रकल्प राबविला जाणार आहे, जिल्ह्यातील या गावांमध्ये एकाच वेळी लाेकसहभागातून हा `स्वच्छतेचा जागर' केला जाणार आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम गावागावांत राबविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ मध्ये भारताला विकसित राष्ट्र करण्याचे ध्येय ठेवले आहे. भारताचा मोठा भाग हा ग्रामीण आहे. ग्रामीण भारताचा विकास झाल्याशिवाय भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण होणार नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाने निश्चित केलेल्या नऊ शाश्वत विकास ध्येयातील 'स्वच्छ व हरित गाव आणि आरोग्यदायी गाव" या दोन संकल्पनानुसार ठाण जिल्ह्यातील ४३१ ग्राम पंचायतींच्या गावखेड्यांमधील रस्त, गल्लया, मैदाने आदीं लाेकसहभागातून स्वच्छ केले जातील, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिष्ज्ञदेत ते बाेलत हेते. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल , अतिरिक्त जिल्हाधिकारी मनिषा जायभये आदी उपस्थित हाेते.