स्वामी विवेकानंदांच्या विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेला महात्मांच्या विचारांचे अधिष्ठान होते - धनश्री लेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 04:55 PM2020-01-13T16:55:22+5:302020-01-13T16:58:44+5:30
सरस्वती शाळेच्या पटांगणात धनश्री लेले यांनी स्वामी विवेकानंद या विषयावर विवेचन केले.
ठाणे - स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेल्या विश्वबंधुत्वा कल्पनेत संत ज्ञानेश्वरांचे पसायदान, संत नामदेवांच्या भक्ती सारखी राष्ट्रभक्ती, संत एकनाथ यांच्यासारखी तोल साधण्याची वृत्ती, समाजात जागृती व्हावी यासाठी संत तुकाराम महाराजांसारखी शब्दांची तळमळ आणि धर्म आणि आत्मोन्नतीचा रामदास स्वामींचा विचार होता. स्वामी विवेकानंदांच्या विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेला या महात्मांच्या विचारांचे अधिष्ठान होते असे मत प्रसिध्द निवेदिका धनश्री लेले यांनी व्यक्त केले.
रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प लेले यांनी गुंफले. युगपुरूष विवेकानंद या विषयावर त्या बोलत होत्या. युगपुरूष विवेकानंदाच्या कार्यावर त्यांनी आपल्या रसाळ वाणीने प्रकाश टाकत त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्वामी विवेकानंदासाठी भारत हा प्राणधर्म होता. या प्राणधर्माचे प्रत्येकाने उत्तम रितीने पालन केले तर समाजात उद्वेष निर्माण होणार नाही. धर्म हा लोकोपयोगी असतो. उपनिषदातून आलेल्या विश्वबंधुत्वाची कल्पना त्यांनी मांडली. बुध्दी प्रामाण्यवादही त्यांनी आपल्याच सांगितले, त्यामुळे स्वामी विवेकानंदाचे विचार समजून घेतांना डावे - उजवे असे करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वामी विवेकानंदाच्या व्यापक विचारांकडे दुषित वृत्तीने पाहू नका, त्यांच्या विचारांकडे स्वच्छ दृष्टीने पाहणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.आपल्या संस्कृतीत धर्म, विज्ञान आणि अध्यात्म एकच संकल्पना स्पष्ट आहेत. आपली संस्कृती सर्व धर्मांना सामावून घेते. आपल्या संस्कृतीला आपल्या धर्माची परंपरा आहे, वैविध्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हा त्यांचा विचार होता. शिक्षणपध्दती केवळ माहिती म्हणजे ज्ञान नाही तर शिक्षण घेण्यासाठी मनाची दारे उघडी ठेवण्याची गरज आहे. शाळांमधून धर्मांचे शिक्षण दिले गेले तर अंधश्रध्दा दूर होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण ज्या राष्ट्रात राहतो, त्या राष्ट्राप्रती कृतज्ञतेची भावना असलीच पाहिजे, तसेच आपल्याला मानवता धर्माचा आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनाचा विसर पडता कामा नये, यासाठी स्वामी विवेकानंद यांनी अखंड प्रयत्न केले. त्यांच्या विचारांचे स्मरण आपण प्रत्येकांनेच केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अद्वैता बापट यांनी वंदे मातरम सादर केले. विद्या नानल यांनी विवेकानंद केंद्राच्या कार्याचा परिचय करून दिला. नंदिनी गोरे यांनी स्वागत केले.आमदार संजय केळकर, समितीचे सचिव शरद पुरोहित व मान्यवर उपस्थितीत होते.