स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने विश्व बंधुत्वाचा मार्ग प्रशस्त - मकरंद मुळे
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 11, 2023 04:45 PM2023-09-11T16:45:52+5:302023-09-11T16:45:56+5:30
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या ठाणे शाखेतर्फे विश्व बंधुत्वाच्या पूर्वसंध्येला विश्वबंधुत्व काळाची गरज यावर मकरंद मुळे यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते.
ठाणे : स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागो येथे धर्मसभेत केलेल्या भाषणाने समृद्ध हिंदू विचारांचे दर्शन जगाला घडले होते. जगण्याचा आधार ठरणाऱ्या भारतीय तत्वज्ञानाचे महत्व जागतिक स्तरावर मान्य झाले होते. बंधुभावाच्या, निरपेक्ष स्नेहाच्या आधारे मानवी जीवन विकसित होऊ शकते याचा जागतिक समुदायात विश्वास जागला होता असे प्रतिपादन राजकीय-सामाजिक विश्लेषक मकरंद मुळे यांनी केले.
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या ठाणे शाखेतर्फे विश्व बंधुत्वाच्या पूर्वसंध्येला विश्वबंधुत्व काळाची गरज यावर मकरंद मुळे यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. ठाणे नौपाडा येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर विवेकानंद केंद्र कोकण प्रांत प्रमुख दीपक नामजोशी होते.
शिकागो येथील जागतिक धर्मसभेत ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंद यांचे ऐतिहासिक भाषण झाले होते. भाषणाच्या सुरवातीचे दोन शब्दांनी स्वामी विवेकानंद यांनी जगाचा मानवी नाते संबंधांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात मूलभूत बदल घडवला होता. त्या सर्वस्वी वेगळ्या भाषणाचे स्मरण म्हणून दरवर्षी ११ सप्टेंबर विश्व बंधुत्व दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त मकरंद मुळे बोलत होते. ते म्हणाले, सद्य स्थितीत स्वामी विवेकानंद यांचे विचार जगाला तारू शकतील. स्वामी विवेकानंद यांनी दिलेला संदेश आधार ठरेल.
नुकतीच आपल्या देशात यशस्वी झालेली जी-वीस परिषद हे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे प्रकटीकरण आहे. १८९३ ची शिकागो सर्वधर्म सभा ते २०२३ भारतातील जी-ट्वेन्टी परिषद हा प्रवास हे हिंदू विचार सामर्थ्याचे विशाल दर्शन आहे. स्वामी विवेकानंद यांनी विदेशात उच्चारलेले बंधू-भगिनी हे दोन शब्द आणि जी-वीस जागतिक परिषदेसाठी वापरलेले वसुधैव कुटुंबकम् हे दोन शब्द भारतीय तत्वज्ञान आहे. असे आपल्या भाषणाच्या शेवटी मुळे यांनी सांगितले.