सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय!
By admin | Published: July 28, 2016 03:38 AM2016-07-28T03:38:34+5:302016-07-28T03:38:34+5:30
टोपलीत पापड्या कडाडविल्या, पालकमंत्र्यांच्या तडाडविल्या, कसाट्याची पाटी लवत जाय, विष्णू सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय, वनगाचा डम्पर खाली कराया जाय
भिवंडी : टोपलीत पापड्या कडाडविल्या, पालकमंत्र्यांच्या तडाडविल्या, कसाट्याची पाटी लवत जाय, विष्णू सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय, वनगाचा डम्पर खाली कराया जाय, पालघरला खाली कराया जाय...
अशा खास आदिवासी गाण्यांची बरसात भिवंडीत झाली. स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी विक्रमगडहून विधानभवनावर निघालेल्या आदिवासीबांधवांनी भिवंडीतील गाजेंगी हॉलमध्ये मंगळवारी रात्री ठेका धरला.आदिवासीबांधव दिवसभर काम केल्यानंतर शीण घालवण्यासाठी आपल्या वस्तीत गाणी म्हणतात. मात्र, येथे त्यांना वाजवण्याकरिता ढोल नसल्याने चक्क प्लास्टिकच्या बादलीवर ठेका धरला.
आदिवासीबांधवांच्या विकासासाठी सरकारने ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांचा समावेश करत पालघर जिल्हा वेगळा केला. तर, जव्हार तालुक्याच्या विकासासाठी विक्रमगड ग्रामपंचायत वेगळी केली. मात्र, यानंतरही परिसरातील आदिवासींचा विकास झाला का, हा प्रश्न आदिवासी नागरिकांना भेडसावत आहे.
आदिवासी ग्रामपंचायतीचा दर्जा असलेल्या विक्रमगड ग्रामपंचायतीला चिमूटभर बिगर आदिवासींच्या मागणीनुसार सरकारने विक्रमगड नगरपंचायत म्हणून जाहीर केले. या नगरपंचायतीचे आर्थिक पडसाद सोसावे लागू नये तसेच सरकारी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून विक्रमगड ग्रुपग्रामपंचायतीतील यशवंतनगर व वाकडूपाडा या गावपाड्यांतील आदिवासीबांधवांनी विरोध केला. यशवंतनगर या गावात नऊ तर वाकडूपाड्यामध्ये सात पाडे आहेत. या दोन्ही गावपाड्यांचा नगरपंचायतीत समावेश करू नये, म्हणून वाकडूपाडा कृती समिती व यशवंतनगर स्वतंत्र ग्रामपंचायत कृती समिती स्थापन केली.
स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी विक्रमगड ते विधानभवन असा लाँगमार्च रविवारपासून सुरू केला. या लाँगमार्चमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सहभागी झाले. हे आदिवासी शहरातील गाजेंगी हॉलमध्ये रात्रभर थांबून त्यांनी बुधवारी सकाळी नारपोलीमार्गे ठाणे-मुंबईच्या दिशेने निघाले. (प्रतिनिधी)
अंथरण्यासाठी प्लास्टिकचा वापर
आदिवासीबांधवांनी पावसापासून बचावासाठी अंगावर घेतलेले प्लास्टिक कापड जमिनीवर अंथरले आणि त्यावर ते झोपले होते.
पालखीत संविधानाची प्रत
आंदोलनकारी आदिवासींनी न्याय मागण्यासाठी पालखीत संविधानाची प्रत ठेवून कायद्याची पालखी वाहिली.
आजही
संघर्ष सुरूच
वयोवृद्ध शंकर भोये यांनी भूमिपुत्रांना ग्राम पंचायतीसाठी आजही संघर्ष करावा लागत आहे, असे सांगत खंत व्यक्त केली.
सवरांना निवेदन
देऊनही फायदा नाही
वाकडूपाडा व यशवंतनगर या दोन्ही गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याच्या निमित्ताने पालकमंत्री विष्णू सवरा यांना निवेदने देऊनही त्याची दखल त्यांनी घेतली नाही,असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
आंदोलनात एमबीए
झालेली तरुणी
या आंदोलनात एमबीए झालेली आदिवासी तरुणी दीपाली श्रीधर पऱ्हाडे हिने आपला लढा आदिवासीबांधवांकरिता असल्याचे सांगितले. त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणार असल्याचे ती म्हणाली.