सफाई कामगार लखपती, अंबरनाथच्या मनीष पाटीलने जिंकले १२.५० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 02:56 AM2018-09-28T02:56:06+5:302018-09-28T02:56:16+5:30

लहान पडद्यावरील एका लोकप्रिय प्रश्नमंजूषा स्पर्धेत अंबरनाथमधील एका सफाई कामगाराने १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. बक्षिसापेक्षा महानायकासमोर बसण्याची संधी मिळाली, याचा आनंद जास्त असल्याचे मत विजेते मनीष पाटील यांनी व्यक्त केले.

Swaran Kamgar Lakhpati, Manish Patil of Ambernath won 12.50 lakhs | सफाई कामगार लखपती, अंबरनाथच्या मनीष पाटीलने जिंकले १२.५० लाख

सफाई कामगार लखपती, अंबरनाथच्या मनीष पाटीलने जिंकले १२.५० लाख

googlenewsNext

अंबरनाथ - लहान पडद्यावरील एका लोकप्रिय प्रश्नमंजूषा स्पर्धेत अंबरनाथमधील एका सफाई कामगाराने १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. बक्षिसापेक्षा महानायकासमोर बसण्याची संधी मिळाली, याचा आनंद जास्त असल्याचे मत विजेते मनीष पाटील यांनी व्यक्त केले.
मूळचे राजापूरचे रहिवासी असलेले मनीष पाटील २० वर्षांपासून अंबरनाथ पालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. लहानपणापासूनच महानायक अमिताभ बच्चन यांचे जबरदस्त फॅन असलेल्या पाटील यांना त्यांच्या प्रश्नमंजूषा कार्यक्रमाची आवड होती. तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर जून महिन्यात त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आधारकार्ड नंबर मागितला. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचा गैरसमज होऊन त्यांनी फोन कट केला. मात्र, विश्वास बसल्यावर त्यांनी स्वत:ची माहिती या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिली. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांना ७ आणि ८ सप्टेंबर रोजी स्पर्धा खेळण्यासाठी बोलावण्यात आले. स्पर्धेत खेळण्यापेक्षा अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळणार असल्याची उत्सुकता त्यांना जास्त होती. त्यांचा मुलगा संदीप याला क्रिकेटची आवड असून स्पर्धेदरम्यान त्याच्यासाठी क्रिकेट किट मनीष यांना भेट म्हणून मिळाले.
स्पर्धेदरम्यान मनीष यांनी १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. त्यानंतरचा प्रश्न २५ लाख रुपयांचा होता. त्याचे उत्तर चुकले असते, तर बक्षिसाची रक्कम तीन लाखांवर येणार होती. उत्तराची खात्री नसल्याने मनीष यांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेनंतर दुसऱ्याच दिवशीपासून मनीष त्यांच्या नियमित सफाईच्या कामात व्यस्त झाले. टीव्हीवर झळकल्यापासून प्रत्येकजण त्यांना ओळखू लागले आहे. प्रभागात सफाईचे काम करताना अनेकजण त्यांना याबद्दल विचारणा करतात.

बक्षिसापेक्षा सन्मान महत्त्वाचा

मनीष नारायण पाटील यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना वाचनाची आवड आहे. काम आटोपल्यानंतर वाचन किंवा मोबाइलवर वेगवेगळी माहिती ते शोधत असतात. अमिताभ बच्चनसमोर त्यामुळेच ते बसू शकले. स्पर्धेत सहभागी झाल्यापासून जास्त सन्मान मिळत असल्याची भावना त्यांची पत्नी मानसी पाटील यांनी व्यक्त केली.
या स्पर्धेत जिंकलेल्या रकमेतून करवगळता त्यांच्या हातात आठ ते नऊ लाख रुपये मिळणार आहेत. या पैशांतून मुलांचे शैक्षणिक भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनीष पाटील यांनी सांगितले.

Web Title: Swaran Kamgar Lakhpati, Manish Patil of Ambernath won 12.50 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या