मिठाई दुकानांनी नियम बसवला धाब्यावर तर काहींनी केलं नियमांचं पालन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 04:15 PM2020-10-18T16:15:51+5:302020-10-18T16:45:21+5:30
Sweet Shop Mithai : मिठाई केव्हापर्यंत खाता येईल यासंबधी सूचना देणारी दिनांक म्हणजेच ‘बेस्ट बिफोर’ ही मिठाईच्या ट्रे समोर लिहीणे अन्न व औषध प्रशासनातर्फे बंधनकारक करण्यात आले आहे
कुलदीप घायवट
कल्याण - आता नवरात्री, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त मोठ्याप्रमाणात मिठाईची खरेदी ग्राहकांकडून केली जाते. मात्र ग्राहकांना विकत घेतलेली मिठाई किती कालावधीपर्यंत खाता येईल, याची माहिती मिळत नाही. यासाठी मिठाई केव्हापर्यंत खाता येईल यासंबधी सूचना देणारी दिनांक म्हणजेच ‘बेस्ट बिफोर’ ही मिठाईच्या ट्रे समोर लिहीणे अन्न व औषध प्रशासनातर्फे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मिठाई दुकानदारांनी हा नियम धाब्यावर बसविला आहे. महापालिका क्षेत्रातील ७ दुकानांची पाहणी केली असता, फक्त दोन नामांकित मिठाई दुकानदारांनी नियमांची अंमलबजावणी केली असल्याचे दिसून आले.
अन्न व औषध प्रशासनाने १ ऑक्टोबर २०२० पासून प्रत्येक खुल्या मिठाईच्या ट्रे वर बेस्ट बिफोर दिनांक टाकल्याचे बंधनकारक केले आहे. विक्रेत्यांना या नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र कल्याण येथील रामबाग, संतोषी माता रोड, गौशाळा रोड येथील दुकानांची पाहणी केली असता, कोणत्याही विक्रेत्याने नियमांचे पालन केले नाही. तर, डोंबिवली पूर्वेकडील फडके रोड आणि कल्याण रेल्वे स्थानक रोड येथील झुंजारराव नगर येथील नामांकित मिठाई विक्रेत्यांनी नियमांची अंमलबजावणी केली आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमावलीचे पालन केले जात आहे. याबाबत ग्राहकांमध्येही जागृती आहे. या नवीन पध्दतीचे ग्राहकांकडून स्वागत केले जात आहे. सध्या बाजारातील रेलचेल कमी आहे. असे, मिठाई विक्रेते श्रीपाद कुळकर्णी म्हणाले.
खूप चांगला नियम शासनाने सुरू केला आहे. यामुळे दुकानदारांकडून होणारी फसवणूक कमी होईल. शिळी मिठाई खाऊन विषबाधा होणाऱ्या घटनेवर लगाम लागेल, अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली. दरम्यान, लाडूसारखी मिठाई तीन-चार दिवस टिकते. मग दोनच दिवस त्याची बेस्ट बिफॉर का आहे. काहीवेळा बाहेरगावी जाताना, नातेवाईकांना मिठाई घेऊन जाताना आदल्या दिवशी खरेदी केली जाते. त्यानंतर इच्छितस्थळी पोहचेपर्यंत मिठाई बेस्ट बिफॉरची तारीख निघून जाते, मग ती मिठाई शिळी होईल का, असे प्रश्न ग्राहकांच्या ग्राहकांच्या मनात तयार झाले आहेत.
शासनाकडून, अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या नियमाचे त्वरित पालन केले. सर्व मिठाईच्या ट्रे समोर बेस्ट बिफॉर याची माहिती लिहिली आहे. ग्राहक मिठाई खरेदी करताना, खाताना नेहमी जागृत असतात. काही ग्राहक यासंदर्भात अनभिज्ञ असतात. ग्राहकांनी सजग राहून दुधाची मिठाई २४ तास तर, लाडू, मोतीचूर यांसारखी मिठाई ४८ तासांच्या आत खावी.
- भूषण गवळी, मिठाई विक्रेते
.कल्याण, डोंबिवली येथील आठ दुकानांची पाहणी केली असता, येथील दुकानांदारांनी नियमांचे पालन केल्याचे आढळून आले. व्यापारी संघटनेशी संपर्क साधून नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत जागृत करत आहोत.
- धनंजय काडगे, सहाय्यक आयुक्त, अन्न सुरक्षा विभाग, कल्याण