पावसाळ्यात बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठी ‘ठामपा’ला हवेत पट्टीचे पोहणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:38 AM2021-05-15T04:38:51+5:302021-05-15T04:38:51+5:30
ठाणे : ठाणे शहरात मान्सून कालावधीत खाडी, तलाव अथवा पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ...
ठाणे : ठाणे शहरात मान्सून कालावधीत खाडी, तलाव अथवा पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिकेच्यावतीने प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्रशिक्षित १२ स्वीमर्सची नेमणूक करण्यात येणार आहे.
शहरात कोणतीही दुर्घटना घडल्यास घटनस्थळी जाऊन नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे, तसेच वित्तहानी टाळण्यासाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत आहे. महापालिकेच्यावतीने मान्सून कालावधीकरिता केलेल्या विविध उपाययोजनांबाबतच्या आढावा बैठकीत शिंदे यांनी, मान्सून कालावधीत खाडीत माणूस बुडणे, अतिवृष्टीमुळे नाल्यात माणसे वाहून जाणे अशा प्रकारच्या घटना घडल्यास, नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रशिक्षित स्वीमर्सची नेमणूक करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात तीन सत्रात प्रशिक्षित स्वीमर्सची नेमणूक करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने मान्सूनच्या चार महिन्यांकरिता प्रत्येक सत्रात चार याप्रमाणे तीन सत्रात एकूण १२ स्वीमर्सची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे पोहण्यात पारंगत असणाऱ्या स्वीमरची नेमणूक केल्यामुळे खाडी, नाले अथवा पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे सहजशक्य होणार आहे.