तरणतलाव, व्यायामशाळा राहणार सुरू , जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:13 AM2019-03-22T03:13:56+5:302019-03-22T03:14:17+5:30
निवडणूक आयोगाने साहित्य ठेवण्यासाठी शहरातील क्रीडासंकुलाचा घेतलेला ताबा आणि त्यामुळे तरणतलाव, व्यायामशाळेच्या वापरावर येणारे निर्बंध पाहता बुधवारी व्यायामपटूंनी प्रतीकात्मक आंदोलन केले.
डोंबिवली - निवडणूक आयोगाने साहित्य ठेवण्यासाठी शहरातील क्रीडासंकुलाचा घेतलेला ताबा आणि त्यामुळे तरणतलाव, व्यायामशाळेच्या वापरावर येणारे निर्बंध पाहता बुधवारी व्यायामपटूंनी प्रतीकात्मक आंदोलन केले. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्याची दखल घेतली. नार्वेकर यांनी अन्य अधिकाऱ्यांसह सध्या बंद असलेल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील बेसमेंटच्या जागेची पाहणी केली. त्यामुळे या जागेचा वापर ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी होण्याची शक्यता आहे. याबाबतचे चित्र शुक्रवारी स्पष्ट होईल.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे मतदान २९ एप्रिलला होणार आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेदरम्यान लागणारे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने केडीएमसीच्या मालमत्तांचा ताबा घेतला आहे. त्यामुळे क्रीडासंकुलातील व्यायामशाळा व जलतरण तलाव बंद करून मुलांच्या खेळावर टाच आणू नये, असे पत्र शिवसेनेचे कल्याण ग्रामीण व पूर्व विधानसभा संघटक कैलास शिंदे यांनी निवडणूक विभागाला दिले होते.
केडीएमसीचे सभागृह नेते श्रेयस समेळ यांनीही आयुक्तांना पत्र पाठवून तलावाची जागा देऊ नका, असे स्पष्ट केले होते. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. परंतु, नार्वेकर यांच्या पत्रानुसार महापालिका प्रशासनाने जागेचा ताबा निवडणूक विभागाकडे दिला. त्याचा निषेध म्हणून व्यायामपटूंनी नार्वेकर यांना निवेदन दिले. तसेच बुधवारी क्रीडासंकुलात व्यायामाचे साहित्य ठेवून प्रतीकात्मक आंदोलन केले. यावेळी व्यायामपटूही सहभागी झाले होते. खेळाडूंच्या खेळावर विरजण पडू नये, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले नाट्यगृह घेतल्यास सर्व बाजूने सोयीस्कर होईल, याकडे व्यायामपटूंनी लक्ष वेधले होते.
सध्या नाट्यगृहाच्या वातानुकूलित यंत्रणेचे काम सुरू असल्याने ते बंद आहे. त्यामुळे या जागेचा वापर ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, तरणतलाव व व्यायामशाळा सुरू राहणार असल्याने खेळाडूंनी आनंद व्यक्त केला आहे.