ठाण्यात स्वाइन फ्लूने आणखी एकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:50 AM2017-08-19T02:50:37+5:302017-08-19T02:50:40+5:30
ठाणे महापालिकेच्या हद्दीत स्वाइन फ्लूने आॅगस्ट महिन्यात आणखी एकाचा बळी घेतला आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीत स्वाइन फ्लूने आॅगस्ट महिन्यात आणखी एकाचा बळी घेतला आहे. त्यामुळे ठामपा हद्दीत आतापर्यंत एकूण २५ जण, तर जिल्ह्यात एकूण ४० जण स्वाइन फ्लूने दगावल्याची माहिती आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
स्वाइन फ्लूच्या या वाढत्या आकडेवारीवरून ही २०१५ ची पुनरावृत्ती असल्याचे दिसत आहे. त्यातच ठामपा हद्दीत स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नसल्याने तोंडावर आलेल्या गणेशोत्सवात त्याचे सावट राहणार असल्याची भीती आहे.
२०१५ या वर्षभरात जिल्ह्यात सुमारे ८२२ जणांना लागण झाली होती. तर, ४८ जणांचा मृत्यू झाला होता. तर, २०१६ या वर्षभरात एकच रुग्ण स्वाइन फ्लूचा आढळून आला होता. मात्र, २०१७ मध्ये गेल्या काही दिवसांतील बदलत्या वातावरणामुळे, स्वाइनचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. त्यामध्ये ठामपा हद्दीत याचा प्रामुख्याने प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८७९ जणांना स्वाइनची लागण झाली असून जिल्ह्यातील ४० जणांचा जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक जुलै महिन्यात २१ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत ६२, नवी मुंबईत ९ आणि मीरा-भार्इंदरमध्ये ३ असे एकूण जिल्ह्यात १८१ जण रुग्णालयांत उपचारार्थ दाखल आहेत.
>ठाण्यात १०७ दाखल
ठाण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीत ५ , मीरा-भार्इंदर येथे ४, नवी मुंबईत ३ जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत अजूनही १०७ जणांवर उपचार सुरू आहेत.