ठाणे जिल्ह्यात जुलैत स्वाईनने २१ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:28 AM2017-08-09T06:28:42+5:302017-08-09T06:28:42+5:30
ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या आजाराने आजघडीला जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर एकूण ३८ जणांचा बळी गेला असून हा आकडा मार्च ते जुलै दरम्यानचा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या आजाराने आजघडीला जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर एकूण ३८ जणांचा बळी गेला असून हा आकडा मार्च ते जुलै दरम्यानचा आहे. तर त्यापैकी जुलै महिन्यात २१ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. तरीसुद्धा अद्यापही शासकीय रुग्णालयात लस उपलब्ध झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूची ८११ जणांना लागण झाली आहे. त्यापैकी २०२ रुग्ण अद्यापही जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ९४ रुग्ण कल्याण महापालिका हद्दीत असून त्या पाठोपाठ ठाण्यात ९३, नवी मुंबईत १२, मीरा-भार्इंदरच्या ३ रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत ५६८ स्वाइन फ्लू बाधीतांवर योग्य उपचार करून घरी सोडण्यात आले. तसेच बळी गेल्या रूग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक २३ जणांना मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ कल्याण- ५, मीरा-भार्इंदर ४ आणि नवी मुंबईतील ३ जणांचा समावेश आहे. तर ३ जणांचा जिल्हाबाहेर मृत्यू झाला आहे.
एकट्या ठाण्यात
४२२ रुग्ण
ठाण्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूबाधीतांचा आकडा ४२२ वर गेला आहे. त्यापाठोपाठ कल्याण- १८५, नवी मुंबईत १०५ तर मीरा-भार्इंदर ९७ तसेच उल्हासनगर येथील २ रुग्णांचा समावेश आहे.