‘त्या’ चार पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 02:55 AM2019-10-20T02:55:05+5:302019-10-20T02:55:09+5:30
आयुक्तांकडून दखल; विभागीय चौकशीसह चौघांचे होणार निलंबन
ठाणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचारासाठी न्यायालयीन कोठडीत असलेले तसेच सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे आ. रमेश कदम यांना खासगी वाहनातून घोडबंदर रोडवरील एका खासगी फ्लॅटमध्ये घेऊन जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पवार याच्यासह चौघा पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांची विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित केले जाण्याची शक्यता एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने वर्तविली.
साठे महामंडळातील भ्रष्टाचाराकरिता २०१५ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे तत्कालीन बडतर्फ आ. कदम यांना अटक झाली होती. तेव्हापासून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मोहोळ मतदारसंघातून सध्या त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. १८ आॅक्टोबर रोजी वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली ते ठाणे कारागृहातून बाहेर पडले होते. मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर एका खासगी कारने ते ठाणे पोलीस मुख्यालयाचे उपनिरीक्षक पवार तसेच तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह ठाण्याकडे येत होते.
कारागृहात जाण्याऐवजी आपल्याला एक पार्सल घ्यायचे असल्याचे सांगत गाडी घोडबंदरला नेण्यास सांगितले. बंदोबस्तावरील पोलिसांनीही सर्वच नियम धाब्यावर बसवत त्यांना ओवळा येथील पुष्पांजली रेसिडेन्सी इमारतीमधील तिसºया मजल्यावरील राजू खरे यांच्या ३०१ क्रमांकाच्या फ्लॅटवर नेले. तेथून कदम हे पार्सल घेऊन निघण्याच्या तयारीत असतानाच ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग व कासारवडवली पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यावेळी कदम आणि राजू खरे यांच्याकडून ५३ लाख ४६ हजारांची रोकड हस्तगत केली.
याबाबत पोलीस उपायुक्तांनी केलेला दोषारोप अहवाल पोलीस आयुक्तांकडे पाठवला असून त्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर पवार यांच्यासह चौघांचीही विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित केले जाऊ शकते. दोषारोप अहवाल तयार पोलिसांनी कदम यांच्यावर मेहेरनजर का दाखवली? त्यांना खरोखर जे.जे. रुग्णालयात तपासणीस नेणे आवश्यक होते का? त्यांनी खासगी गाडीने नेण्यासाठी कोणाची परवानगी घेतली? गाडी कारागृहाकडे नेण्याऐवजी ओवळा येथे नियमबाह्य पद्धतीने का नेली? असे अनेक सवाल उपस्थित झाल्याने पोलीस मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्तांनी त्यांचा दोषारोप अहवाल तयार केला आहे.