उल्हासनगरमधील १४ नगरसेवकांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:42 AM2021-07-27T04:42:16+5:302021-07-27T04:42:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या १४ नगरसेवकांविरोधात भाजपचे अध्यक्ष ...

Sword hanging over 14 corporators in Ulhasnagar | उल्हासनगरमधील १४ नगरसेवकांवर टांगती तलवार

उल्हासनगरमधील १४ नगरसेवकांवर टांगती तलवार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या १४ नगरसेवकांविरोधात भाजपचे अध्यक्ष व गटनेते जमनुदास पुरस्वानी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. या प्रकाराने भाजपतील ओमी टीम व इदनानी समर्थक नगरसेवकांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार आहे.

उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुका जून महिन्यात झाल्या असून, बहुमत असताना पक्षातील बंडखोर नगरसेवकामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला, असा आरोप भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी केला. भाजपचे ओमी कलानी टीम व इदनानी समर्थक नगरसेवक पंचम कलानी, आशा बिराडे, रवींद्र बागूल, शुभांगी निकम, छाया चक्रवर्ती, डिंपल ठाकूर, दीपा पंजाबी, रेखा ठाकूर, सरोजनी टेकचंदानी, हरेश जग्यासी, जीवन इदनानी, दीप्ती दुधानी, ज्योती चैनांनी व इंदिरा उदासी यांनी पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करून त्याविरोधात मतदान केले. पक्षात शिस्त राखण्यासाठी व व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी २५ जुलै रोजी पक्षाचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली आहे.

भाजपातील बंडखोर तसेच ओमी कलानी टीम व इदनानी समर्थक नगरसेवकांत या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक ९ नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप डावलून शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान करून महापौरपदी निवडून आणले. या ९ नगरसेवकांविरोधातही भाजपाने कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. मात्र, त्यावर १८० दिवसांत निर्णय न झाल्याने भाजपने न्यायालयात दाद मागितली. यापूर्वी स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना आघाडीने बाजी मारली होती. मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने रिपाइंच्या मदतीने सभापतीपद राखले असून शिवसेना आघाडीत असलेले रिपाइंचे गटनेता व उपमहापौर भगवान भालेराव हे भाजप गोटात गेल्याने, भाजपची ताकद वाढली आहे.

------------

भाजपची याचिका अवैध - ओमी कलानी

भाजपने व्हीपचे उल्लंघन केले म्हणून कोकण विभागीय आयुक्तांकडे धाव घेऊन याचिका दाखल केली. ती पूर्णतः अवैध असून नगरसेवकांविरोधात काही कारवाई होणार नाही, असे मत ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी यांनी दिली. तसेच जीवन इदनानी यांनीही काही होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली.

Web Title: Sword hanging over 14 corporators in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.