समाज व्यवस्थेपेक्षा धर्मव्यवस्था होतेय वरचढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 04:13 AM2019-01-21T04:13:14+5:302019-01-21T04:14:06+5:30

नयनतारा सहगल यांच्या भाषणातील राजकीय मुद्द्यांमुळे यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आमंत्रण राजकीय दबावापोटी त्यांना नाकारण्यात आले.

The system of religion is more important than the society | समाज व्यवस्थेपेक्षा धर्मव्यवस्था होतेय वरचढ

समाज व्यवस्थेपेक्षा धर्मव्यवस्था होतेय वरचढ

Next

कल्याण : नयनतारा सहगल यांच्या भाषणातील राजकीय मुद्द्यांमुळे यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आमंत्रण राजकीय दबावापोटी त्यांना नाकारण्यात आले. आपल्याच हाताने भारताची प्रतिमा आपण एक असहिष्णू देश म्हणून करीत आहोत. ती आता दुरुस्त केली पाहिजे. आजचा काळ हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा आहे. या काळात समाजव्यवस्थेपेक्षा धर्माची व्यवस्था वरचढ होऊ पाहत आहे. चळवळींना संपविण्याचे सत्र सुरू झाले असल्याचे परखड मत सुप्रसिद्ध कवयित्री व महानगर मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा नीरजा यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
मुंबई मराठी साहित्य संघ आणि कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४४व्या महानगर मराठी साहित्य संमेलनात नीरजा बोलत होत्या. स्वागताध्यक्ष माजी नगरसेवक रवी पाटील होते. रेखा नार्वेकर यांच्या ‘अमृतकण कोवळे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनीता राणे, मुंबई मराठी साहित्य संघाचे प्रमुख कार्यवाह डॉ. रा. अ. भालेराव, कार्याध्यक्ष प्रा. उषा तांबे, संस्थेच्या साहित्य शाखा कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, सरचिटणीस भिकू बारस्कर, कलाकार विघ्नेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र भामरे यांनी केले.
नीरजा म्हणाल्या, पंडित नेहरू यांनी भारतीयत्वाची व्याख्या मांडताना सहिष्णू असणे, हीच भारतीय असण्याची खूण आहे, असे म्हटले होते, पण आज असहिष्णुतेवर बोलण्याची वेळ आली आहे. ही खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण महाराष्ट्राची ओळख एक पुरोगामी राज्य अशीच आहे. महाराष्ट्राला प्रबोधनाचा मोठा इतिहास आहे. ७०-८०च्या दशकात प्रत्येक जण आपल्या शैलीत लिहीत होता. प्रभावाखाली लिहिणारी माणसे होती. मात्र, ती तग धरू शकली नाहीत. त्या काळी अनेक गुंतागुंतीच्या विषयांवर लिखाण व्हायचे. मात्र, अशा प्रवाहाच्या विरोधात लिहिणाऱ्यांना समाज माध्यमावर ट्रोल केले जात नव्हते. माणसाच्या आयुष्यातील निरर्थकता, त्या काळची टॅगलाइन होती. आपल्या अस्तित्वाची वेदना घेऊन लेखक लिखाण करीत होते. साहित्यातून दुर्बोधता उमटत होती. ‘कोसला’ आणि ‘सखाराम बाइंडर’ यासारखे वातावरण ढवळून निघणारे प्रयत्न त्या वेळी साहित्यातून झाले. आजचे लेखन हे कोरडेपणाकडे चाललेले आहे. एकीकडे आपण भावनात्मक विचार करतो आणि वेगळ्या पातळीवर कोरडेपणा जपतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
महानगरीय साहित्याचा प्रवाह क्षीण होत चाललेला आहे. आताचा काळ हा संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारा आहे. लेखकासाठी हा जिकिरीचा काळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लेखक आणि कवींमध्ये अस्वस्थता जाणवत आहे. ही अस्वस्थता शहरांपुरती मर्यादित न राहता खेड्यांतदेखील आहे. सत्यपाल राठोडसारखे कवी ती आपल्या कवितेतून मांडत आहे. या सगळ्या वातावरणात तांत्रिक जगणे जाणवत आहे. जागतिकीकरणातून क्रांती झाली. त्यातून आपण चांगले आयुष्य जगू शकतो, परंतु तसे होताना दिसत नाही. स्त्रियांची अवस्था ही तशीच आहे. कवयित्री त्यावर लिहीत आहेत. ग्रामीण भागातील स्त्रियांना समाजाच्या चौकटीतून बाहेर येता येत नाही. ९० नंतरचे स्त्रियांचे लिखाण हे सीमारेषेवर धडपडताना दिसत आहे. मध्यमवर्गीय माणूस चळवळीपासून तुटू लागला आहे. अशा वेळी एक लेखक आणि कवी म्हणून काय करता येईल, हे आपण पाहिले पाहिजे, असे नीरजा या वेळी म्हणाल्या.
>लेखक, कवींचे मौन का?
मुंबईसह आसपासच्या सर्व महानगरांवर बिल्डरांनी कब्जा केला आहे. धनदांडग्यांचे डोळे फक्त शेअर बाजारांकडे लागले आहेत.
सांस्कृतिक, सामाजिक वातावरण गढूळ झाले असताना लेखक आणि कवी त्यावर काही बोलण्यास तयार नाही. विविध आक्रमणांच्या ओझ्याखाली दबले गेले असताना माणूसपण जपण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे.
दाभोलकर, गौरी लंकेश यासारख्या चळवळीतील लोकांना संपविण्याचा डाव असल्याचा आरोप करीत, सहगल यांना आमंत्रण नाकारल्याचा नीरजा यांनी निषेध केला.

Web Title: The system of religion is more important than the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.