तान्ह्या बाळाला विकण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:06 AM2017-07-26T00:06:53+5:302017-07-26T00:09:46+5:30
अवघ्या सहा दिवसांच्या बालकाच्या विक्रीचा डाव सोमवारी रात्री पोलिसांनी उधळून लावत तीन तासांत त्या बालकाची चारजणांच्या टोळक्याकडून सुटका केली. एखाद्या चित्रपटाच्या थरारक कथानकासारखी ही घटना असून आरोपींना जेरबंद करण्याकरिता
ठाणे: अवघ्या सहा दिवसांच्या बालकाच्या विक्रीचा डाव सोमवारी रात्री पोलिसांनी उधळून लावत तीन तासांत त्या बालकाची चारजणांच्या टोळक्याकडून सुटका केली. एखाद्या चित्रपटाच्या थरारक कथानकासारखी ही घटना असून आरोपींना जेरबंद करण्याकरिता पोलिसांनी वेषांतर करुन कुणी वेटर झाला तर कुणी ग्राहक झाला. दोन लाखांचा सौदा पूर्ण करण्याकरिता नोटांच्या आकाराचे कोरे कागद घेऊन नोटांची बंडले तयार केली गेली.
पाच वर्षाच्या मुलीच्या विक्रीसाठी आलेल्या एका महिलेला अलीकडेच भिवंडीत याच पथकाने अटक केली होती. जुलै महिन्यात मूल विक्रीची ही दुसरी घटना घडली. दोन लाखांच्या मोबदल्यात ६ दिवसांच्या नवजात बालकाची विक्री करण्यासाठी ‘सना सय्यद नावाची महिला’ गिºहाईक शोधत असल्याची खबर ठाणे शहर सह-पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांना मिळाली. ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या पथकाने बोगस ग्राहक तयार करून त्या महिलेला ठाण्यातील एका हॉटेलमध्ये बोलवून घेतले. त्या ग्राहकाने आपल्याला चार मुली आहेत. पण, मुलगा नसल्याने हे मूल खरेदी करण्याची तयारी दाखवली. मात्र दोन लाखांची मागणी जास्त असल्याने तडजोड करण्याची विनंती केली.
मात्र, ती महिला दोन लाखांवर ठाम राहिल्याने पोलिसांना तातडीने दोन लाखांची जुळवाजुळव करणे भाग होतो. कोºया कागदांच्या वर-खाली नोटा ठेवून नोटांची बंडले तयार केली गेली. त्या महिलेला संशय येऊ नये यासाठी पोलिसांनी वेषांतर करुन कुणी हॉटेलात वेटर झाला तर कुणी सफाई कर्मचारी. मुंब्य्रातील सना रुल आमिन सय्यद (३२), सना कुट्टुस शेख (२२) आणि सादिक इक्बाल खान (२०) तसेच रोहित लक्ष्मण स्वामी उर्फ साहिल सय्यद (२२) हे बालकाच्या विक्रीकरिता आले असता चौघांना अटक करून त्या बालकाची सुटका केली.
या बालकाची रवानगी डोंबिवलीतील जननी आशिष या संस्थेत केली आहे. त्या आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना ठाणे जिल्हा न्यायालयाने २९ जुलै रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई, एएचटीसी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एस. बी. चव्हाण, के. व्ही. के. उपाळे, सहा पोलीस उपनिरीक्षक आर. जे. महाले, पोलीस हवालदार तानाजी वाघमोडे, अविनाश बाबरेकर, विजय पवार, बडगुजर, पोलीस नाईक भोईर, कारंडे यांनी केली.