ज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 03:38 PM2019-06-28T15:38:32+5:302019-06-28T15:50:00+5:30
ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश ऊर्फ भाई गायतोंडे यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ठाणे - ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश ऊर्फ भाई गायतोंडे यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ८७ वर्षांचे होते. ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गायतोंडे यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. दिलीप गायतोंडे, मुलगी असा परिवार आहे.
ज्येष्ठ तबदलावादक पं. अहमदजान थिरकवा यांचे शेवटचे शिष्य अशी भाईंची ओळख होती. पेशाने केमिकल इंजिनिअर असूनही तबलावादनाकडे त्यांचा कल अधिक होता. पं. जगन्नाथबुवा पुरोहित अर्थात गुणीदास यांच्याकडे त्यांनी अनेक वर्ष तबलावदानाचे धडे गिरविले, त्याचप्रमाणे ज्येष्ठ तबलावादक पं. अहमदजान थिरकवा यांच्याकडेही त्यांनी तालीम घेतली होती.
नोकरी, तबलावादनाचा सराव यांच्यासह क्रिकेटची आवड असलेल्या त्यांनी रणजी क्रिकेटमध्येही छाप पाडली होती. तबलावादन ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी देशातील अनेक विद्यापीठांमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले. लखनऊ, दिल्ली येथील अनेक विद्यापीठांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठांमध्ये ते मानद व्याख्याते म्हणून कार्यरत होते.
वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात १५ जून रोजी त्यांनी अखेरचे व्याख्यान दिले. विद्यापीठांसह राहत्या घरीही त्यांनी सुमारे अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांना तबल्याचे निः शुल्क प्रशिक्षण दिले. तबल्याचं सौंदर्यशास्त्र या विषयावर त्यांचा अभ्यास होता.
पं. राम मराठे, पं. सी आर व्यास, पं. यशवंतबुवा जोशी, पं. निळकंठ बुवा अभ्यंकर, पंडिता माणिक वर्मा यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांसह त्यांनी अनेक कार्यक्रमात साथ केली होती. तबला वादन या विषयावर त्यांची अनेक पुस्तके लिहिली. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना अनेक मानसन्मान लाभले. संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते.