क्वॉरंटाइन कक्षात तबलिगींचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 06:03 AM2020-04-08T06:03:30+5:302020-04-08T06:03:48+5:30
भिवंडीतील प्रकार : पोलिसांकडे मागितले संरक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्यांचा शोध घेऊन आरोग्य विभागाच्या मदतीने या सर्वांना भिवंडी येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र, तेथे तबलिगींचा गोंधळ सुरू आहे. ते एकत्र येत असल्याची तक्रार त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे, पालिका प्रशासनाने त्यांना आवरण्यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी पोलीस उपायुक्तांकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी होऊन परतलेल्या नागरिकांचा सर्वत्र शोध सुरू आहे. दिल्ली येथे कार्यक्रमानिमित्त जमलेले तबलिगी परदेशातून आलेल्या कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना क्वारंटाइन करण्याचे आदेश काढण्यात आले. तसेच, आदेश न पाळल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भिवंडीतील गोवा नाका येथील टाटा क्वारटाइन सेंटरमध्ये ५४ तबलिगी असून तेथे त्यांचा गोंधळ सुरूच आहे. दररोज लागणाºया वस्तू त्यांना पुरविल्या असल्या तरीही हे सर्वजण एकत्र येत गोंधळ घालत नियमाचे उल्लंघन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वारंवार त्यांना सूचना देऊनही ते वेगळे राहत नसून उलट अरेरावी करतात. त्यामुळे, पालिका प्रशासनाकडून पोलीस उपायुक्तांना तबलिगींच्या गोंधळाला आवर घालण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.