ताडीच्या अतिसेवनाने घेतला दोघांचा जीव; डोंबिवलीच्या कोपरगाव येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 08:25 AM2022-01-12T08:25:03+5:302022-01-12T08:25:09+5:30
विक्रेत्याच्या शोधासाठी पथके रवाना
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपरगावात ताडीचे अतिसेवन दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजता उघडकीस आली आहे. सचिन पाडमुख (२२) आणि स्वप्निल चोळखे (३०) अशी त्यांची नावे आहेत. यातील स्वप्निल हा ट्रॅफिक वॉर्डन होता. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी ताडी केंद्र चालविणाऱ्या रवी बथणी याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तो फरार झाला असून, त्याला अटक करण्यासाठी पथके रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी दिली.
सचिन आणि स्वप्निल हे अन्य दोघा मित्रांसमवेत पश्चिमेतील अण्णानगर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला गावदेवी मंदिराजवळील कोपरगावातील एका ताडी विक्री केंद्रावर ताडी पिण्यासाठी गेले होते. तेथे सचिन आणि स्वप्निलने ताडीचे अतिसेवन केल्याने त्यांना त्रास झाला. त्यांची प्रकृती ढासळल्याने दोघांना रुग्णालयात दाखल केले; परंतु ताडीच्या अतिसेवनामुळे त्यांच्या छातीवर दाब आला आणि त्यात हृदयविकाराचा झटका येऊन दोघांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलीस ताडी विक्री केंद्रावर पोहोचले. परंतु तत्पूर्वीच केंद्र चालविणारा रवी तेथून पसार झाला होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात हलगर्जीचा गुन्हा दाखल केला असून, त्याच्या अटकेसाठी पथके पाठवण्यात आली आहेत. माजी मंत्री व स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी भालेराव यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. घटनेबाबत खेद व्यक्त करताना बेकायदा सुरू असलेल्या केंद्राबाबत दारू उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. जास्त नशा येण्यासाठी ताडीत मोठ्या प्रमाणात रसायने मिसळली जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हे ताडी विक्री केंद्र बेकायदा होते.
‘लवकरच कामावर रुजू होणार होता’
स्वप्निल हा २०१५ पासून डोंबिवली वाहतूक विभागात कार्यरत होता. परंतु, संधिवाताच्या त्रासामुळे तो दीड महिन्यापासून वैद्यकीय रजेवर होता. लवकरच तो कामावर रुजू होणार होता. परंतु सोमवारी त्याचा मृत्यू झाला. स्वप्निलच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि पाच वर्षांची मुलगी आहे. तर सचिन हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण आहेत.
ताडीच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू ओढावला, असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी त्यांनी प्राशन केलेल्या ताडीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून नमुन्यांचा अहवाल आल्यावर कारण स्पष्ट होणार आहे.
- पंढरीनाथ भालेराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक