बोगस कागदपत्रांद्वारे लाटला टीडीआर
By admin | Published: July 15, 2016 01:28 AM2016-07-15T01:28:09+5:302016-07-15T01:28:09+5:30
बोगस कागदपत्रे सादर करून टीडीआर लाटणाऱ्या विकासकाची बांधकाम परवानगी रद्द करण्याबरोबरच त्याच्यासह अन्य संबंधित व्यक्तींवर फौजदारी कारवाईचे आदेश केडीएमसीचे
कल्याण : बोगस कागदपत्रे सादर करून टीडीआर लाटणाऱ्या विकासकाची बांधकाम परवानगी रद्द करण्याबरोबरच त्याच्यासह अन्य संबंधित व्यक्तींवर फौजदारी कारवाईचे आदेश केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले. या आदेशान्वये वाडेघर येथील मोहन रिजन्सी को.आॅप. सोसायटीची बांधकाम परवानगी रद्द केली आहे. वालधुनी येथील टीडीआर घोटाळा गाजत असताना आता या प्रकरणामुळे आणखी एका टीडीआर घोटाळ्याची त्यात भर पडली आहे.
वाडेघर येथील कासम जुसब राजकोटवाला यांच्या भूखंडाचे कूलमुखत्यारपत्र बनवून त्याआधारे लॅण्डमार्क कन्स्ट्रक्शनने केडीएमसीकडून २००२ मध्ये बांधकाम परवानगी आणि तसेच वाढीव चटईक्षेत्र मिळवले. या परवानगीच्या आधारे संबंधित विकासकाने मोहन रिजन्सी सोसायटी उभारली आहे. दरम्यान, विकासकाने केलेल्या गैरप्रकाराबाबत तसेच केडीएमसी व राजकोटवाला यांच्या कुटुंबाच्या फसवणुकीप्रकरणी अंजुम खान व श्रीनिवास घाणेकर यांनी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे १६ फेब्रुवारी २०१३ ला तक्रार केली होती. या तक्रारीवर अप्पर पोलीस आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालानुसार सरकारच्या नगरविकास विभागाने २१ नोव्हेंबर २०१५ ला चौकशीचे आदेश महापालिकेला दिले होते.
चौकशीत कागदपत्रांची वैधता व सत्यता तपासणीच्या दृष्टीने विकासक व जमीनमालक यांची सुनावणी झाली. यात केडीएमसीची फसवणूक झाल्याचेही उघडकीस आले आहे.