दुधासाठी अतिरिक्त पाच रूपये; गायीला टॅग करून घ्या!
By सुरेश लोखंडे | Published: January 29, 2024 06:14 PM2024-01-29T18:14:17+5:302024-01-29T18:15:22+5:30
या गाेवर्गीय (गाय) जनावरांचा टॅग करून घेतल्यानंतर संबंधीत शेतकरी, पशुपालकास शासनाचा याेजनांचा लाभ घेता येत आहे.
सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : गाईच्या दुधासाठी पाच रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय अलिकडेच राज्य शासनाने घेतला आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना, पशुपालकांना हाेणार आहेच. त्यासाठी आधीच ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील ७६ हजार गायीं म्हणजे गाेवर्गीय जनावरांपैकी ७२ हजार जनावरांना टॅग करून या जनावरांची नाेंद प्रणालीवर करून घेतली आहे. याप्रमाणेच उर्वरित गायीं संबंधीत शेतकऱ्यांनी तत्काळ टॅग करून घेत शासनाच्या याेजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी यांनी केले आहे.
या गाेवर्गीय (गाय) जनावरांचा टॅग करून घेतल्यानंतर संबंधीत शेतकरी, पशुपालकास शासनाचा याेजनांचा लाभ घेता येत आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी काही नवीन गोवर्गीय पशुधन टॅग करण्याचे राहून गेले असतील तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन त्यांच्याकडे असलेल्या गोवर्गीय पशुधनास टॅग तत्काळ करून घ्यावा आणि त्याची भारत प्रणालीवर नोंद करण्याची गरज असल्याचेही डाॅ. ताेडणकर यांनी स्पष्ट केले. या टॅग करून प्रणालीवर नाेंद केलेल्या या जनावरांच्या विविध याेजनांचा लाभ संबंधितांना पशुसंवर्धन विभागाकडून करून घेता येत असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार शासनाने अलिकडेच घेतलेल्या शासन निर्णयानुसार संबंधित गायीच्या मालकांना या पाच रूपये अतिरिक्त अनुदानाचा लाभ घेता येणे शक्य झाले आहे.