तहसीलची दुरवस्था, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 04:44 AM2018-08-26T04:44:23+5:302018-08-26T04:44:42+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालय हे प्रशासकीय इमारतीत सुरू आहे. यातील तहसीलदार कार्यालयाच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागल्याने कर्मचाऱ्यांना काम करणेही अवघड जात आहे. त्यातच स्वच्छतागृहाच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही त्याची कोणतीच दखल घेतली जात नाही.
अंबरनाथ तालुक्याचा कारभार ज्या तहसीलदार कार्यालयातून चालवण्यात येत आहे, त्या कार्यालयात कामगारांना अनेक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र, इमारतीच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे, तर काही ठिकाणी प्लास्टरही निघत आहे. असे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वच्छतागृहांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांची दुरुस्ती केली जात नाही. अनेक ठिकाणी मल वाहून नेणारी वाहिनी तुटलेली आहे. पाणीपुरवठ्याच्या वाहिनीचीही दुरुस्ती होत नसल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व समस्यांबाबत तहसीलदार जयराज देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना कल्पना दिलेली आहे. मात्र, त्याकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.
इमारतीसोबत इमारतीच्या परिसराकडेही दुर्लक्ष होत आहे. इमारतीची संरक्षक भिंतही अनेक ठिकाणी तोडण्यात आलेली आहे. त्याच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. परिसरात पाणी वाहून नेण्यासाठी तयार केलेल्या नाल्यावर लावलेली जाळीही तुटल्याने त्या ठिकाणी गाडी अडकते. अनेक गाड्यांचे चाक या नाल्यात अडकते.
इमारतीच्या देखभालीबाबत सर्व कल्पना दिली आहे. इमारतीच्या दुरुस्तीसाठी कामे हाती घ्यावीत, यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यासंदर्भात कार्यवाही करत आहे. हे काम लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे.
- जयराज देशमुख, तहसीलदार, अंबरनाथ