टीजेएसबीमध्ये जमा झाले शिक्षकांचे पगार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 10:32 PM2017-07-30T22:32:48+5:302017-07-30T22:32:51+5:30
ठाणे, दि. 30 - एकीकडे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिक्षकांचे पगार आपल्याच बँकेतून होण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी राज्य शासनाला साकडे घातले असतानाच आता ठाणे जनता सहकारी बँकेत (टीजेएसबी) शिक्षकांचे पगार १ तारखेपूर्वीच जमा झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाने जरी कोणत्या बँकेत शिक्षकांनी खाती उघडावीत याची सक्ती नसावी, असा आदेश दिला असला तरी टीजेएसबीतून पगार होण्यासाठी राज्य शासनाकडून चाललेला आटापिटा पाहता शिक्षक मात्र अजूनही संभ्रमात आहेत.
गेल्या ४० वर्षांपासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसी) बँकेत जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार विनाअडथळा होत आहेत. या वेतपापोटी थकीत असलेले सुमारे पाच कोटींचे कमिशनही बँकेने काही वर्षांपूर्वीच माफ केले आहे. गेल्या १२ वर्षांपासून कोणत्याही मोबदल्याविना सुमारे २० हजार शिक्षकांचे ७० कोटींचे पगार या बँकेतूनच होत आहेत. आता अचानक राज्य शासनाच्या परिपत्रकामुळे शिक्षकांना टीजेएसबीमध्ये खाती उघडण्यास भाग पाडून तिकडे वेतन करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे १४ हजार ५०० शिक्षकांनी टीजेएसबी बॅकेत खाती उघडली. त्यामुळे आता ज्या शाळांनी टीजेएसबीच्या नावे पगाराचे विवरण पत्र (पे बिल) शासनाकडे सुपूर्द केले होेते, त्यांचे धनादेश शासनाकडून मिळाल्यावर अवघ्या २४ तासांमध्ये त्या शाळांमधील सर्व शिक्षकांच्या टीजेएसबीच्या खात्यात पगार जमा केल्याचा दावा टीजेएसबीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे यांनी केला आहे. तसेच वेतन खात्यात जमा होण्यापूर्वीच शिक्षकांना त्यांचे एटीएम कार्ड आणि चेकबुकही व्यक्तिश: देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, टीजेएसबी बँकेत जरी १४ हजार ५०० शिक्षकांनी खाती उघडली असली तरी त्यांच्यासह २० हजार शिक्षकांची खाती ही टीडीसी मध्येच आहेत. शिवाय, त्यांच्यावर सक्ती करण्यात येऊ नये असे मुंबई उच्च न्यायालयानेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन येत्या काही दिवसांमध्ये टीडीसी बँकेतच पूर्वीप्रमाणे होईल, असा दावा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगिरीथ भोईर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.