कोरोनाकाळात झुंडीने घेराव घालणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:25+5:302021-03-14T04:35:25+5:30

ठाणे : कोरोनाकाळात १५०-२०० जणांच्या झुंडीने येऊन घेराव घालणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्त्यांवर कारवाई करा, अशी मागणी भाजपने ...

Take action against the corporators who surrounded the herd during the Corona period | कोरोनाकाळात झुंडीने घेराव घालणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करा

कोरोनाकाळात झुंडीने घेराव घालणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करा

Next

ठाणे : कोरोनाकाळात १५०-२०० जणांच्या झुंडीने येऊन घेराव घालणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्त्यांवर कारवाई करा, अशी मागणी भाजपने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.

ठाण्यात अनावश्यक असलेले तीन पादचारी पूल उभारून १३ कोटींची लूट केली जात असल्याच्या प्रकारावर भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच या खर्चातून शिवसेनेकडून निवडणूक निधी जमा केला जात असल्याचा आरोप केला होता. आपल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी शिवसेनेने घेराव घातला, असा आरोप डुंबरे यांनी केला आहे.

शिवसेनेच्या नगरसेविका राधिका फाटक, मीनल संखे, साधना जोशी, नगरसेवक दिलीप बारटक्के, विकास रेपाळे, सिद्धार्थ ओवळेकर व १५०-२०० कार्यकर्ते डुंबरे यांच्या केबिनमध्ये विनामास्क घुसले. तसेच त्यांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. कोरोनाकाळात गर्दी जमवून कायद्याचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा, निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपने दिला आहे.

आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना शुक्रवारी सायंकाळी उशिरा निवेदन देण्यात आले.

महापौरांच्या आदेशामुळे सुरक्षारक्षकांची टाळाटाळ

महापौर नरेश म्हस्के यांच्या आदेशानुसार मनपा मुख्यालयातील सुरक्षारक्षकांनी १५० ते २०० कार्यकर्ते जमा झाल्यानंतरही गर्दी हटविली नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकांवरही कलम १८० अन्वये कारवाई करावी, अशी मागणी डुंबरे यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. इतकेच नव्हेतर, शिवसेनेच्या दडपशाहीची माहिती मिळाल्यानंतर मनपा मुख्यालयात आलेले भाजपचे नगरसेवक व कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावरच अर्धा तासाहून अधिक काळ रोखण्यात आले होते.

माफी कदापि मागणार नाही : डुंबरे

शिवसेना नगरसेवक-नगरसेविकांनी मला धमक्या देऊन आठ दिवसांत माफी मागण्यास सांगितले. पादचारी पुलासंदर्भातील आरोपांवर मी आजही ठाम आहे. मी कदापि माफी मागणार नाही, असे डुंबरे यांनी सांगितले. डुंबरे एकटे पडल्याचे शिवसेनेकडून पसरविण्यात येत आहे. मात्र, भाजपचे सर्व नगरसेवक आपल्या पाठीशी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

-------------------------

Web Title: Take action against the corporators who surrounded the herd during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.