फीसाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करा; पालकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:38 PM2020-12-16T23:38:42+5:302020-12-16T23:38:50+5:30
कोरोनाच्या काळात पालकांपुढे फी भरण्यासाठी उत्पन्नाचे साधनच नव्हते. अशा वेळी फीसाठी सक्ती न करण्याच्या सूचनाही होत्या.
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील काही शाळा या गेल्या शैक्षणिक वर्षाची आणि चालू शैक्षणिक वर्षाच्या फीसाठी पालकांना त्रास देत आहेत. कोरोनाच्या काळात पालकांपुढे फी भरण्यासाठी उत्पन्नाचे साधनच नव्हते. अशा वेळी फीसाठी सक्ती न करण्याच्या सूचनाही होत्या. मात्र, तरीही त्या सूचनांकडे दुर्लक्ष करत शाळा प्रशासन फी साठी पालकांना त्रास देत आहे. अशा शाळांच्या प्रशासनाविरोधात बुधवारी ‘मी अंबरनाथ’कर संघटनेच्या वतीने ६० पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
कोरोनाच्या संकट काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. त्या काळात पालकांना आपल्या मुलांच्या शाळेची फी भरणेही शक्य नव्हते. अशा कठीण काळात सरकारनेही फी संदर्भात सक्ती न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, शाळा प्रशासन नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच, पुन्हा फीसाठी पालकांना त्रास देत आहेत. फी भरण्याची सक्ती केली जात आहे. शाळेच्या या त्रासाला कंटाळून काही पालकांनी ‘मी अंबरनाथकर’ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. त्यांच्याकडे शाळा प्रशासनाची तक्रारही दाखल केली. या आधीही या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतीच ठोस कार्यवाही करण्यात आली नव्हती. त्यामुळे या पालकांनी नाराजी व्यक्त केली.
आंदोलनाचा इशारा
गटशिक्षणाधिकारी यांनी या संदर्भात योग्य आणि लागलीच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी संघटनेचे पदाधिकारी यांनी केली आहे. पालकांना पुन्हा शाळा प्रशासनाने त्रास दिल्यास पालक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.