फीचा तगादा लावणाऱ्या शाळांवर करणार कारवाई; मनविसेकडे केल्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:00 AM2020-07-23T00:00:34+5:302020-07-23T00:00:40+5:30
काही शाळांनी विद्यार्थी व पालकांना शिक्षकांचा पगार, इतर शाळा खर्च भागविण्यासाठी दरमहा शालेय फी भरा, असे मेसेज पाठवले आहेत
उल्हासनगर : फीसाठी पालक व मुलांकडे तगादा लावणाºया शाळांवर कारवाई करण्याचे संकेत शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी.एम. मोहिते यांनी दिले. मनसे विद्यार्थी संघटनेचे शहर उपाध्यक्ष कल्पेश माने यांच्याकडे फीसाठी तगादा लावणाºया शाळांच्या तक्रारी आल्यानंतर प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
उल्हासनगरमध्ये कोरोनाने थैमान घातले असून रुग्णसंख्या सहा हजारांवर गेली असून कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य सरकारने शाळा बंद ठेवल्या आहेत. मात्र, मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून अनेक शाळांनी सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन वर्ग सुरू केले आहेत.
दरम्यान, काही शाळांनी विद्यार्थी व पालकांना शिक्षकांचा पगार, इतर शाळा खर्च भागविण्यासाठी दरमहा शालेय फी भरा, असे मेसेज पाठवले आहेत. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळे ते शालेय फी देऊ शकत नाही. तसेच राज्य सरकारने आदेश काढून शाळांनी फीसाठी मुले व पालकांकडे तगादा लावू नका, असे स्पष्ट केले आहे.
माने यांच्याकडे फीसाठी शाळा तगादा लावत असल्याच्या असंख्य तक्रारी घेऊन पालक आले होते. त्यांनी मोहिते यांची भेट घेऊन शहरातील शाळांची परिस्थिती कथन केली. तसेच फीसाठी तगादा लावणाºया शाळांवर कारवाईची मागणी केली. मोहिते यांनी शहरातील अनुदानित, विनाअनुदानित शाळांना कारवाई का करू नये, असे पत्र पाठवले आहे. शाळा व्यवस्थापन आता कुठला निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.