ठाणे, पालघरच्या ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई करा; सर्वसाधारण सभेत उमटले पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 03:38 AM2018-09-16T03:38:07+5:302018-09-16T03:38:34+5:30
न्यायालयीन आदेशानुसार ठाणे व पालघर जिल्ह्यातील बदल्या एकाच वेळी झाल्या
ठाणे : न्यायालयीन आदेशानुसार ठाणे व पालघर जिल्ह्यातील बदल्या एकाच वेळी झाल्या. सुमारे चार महिने होऊनही हे शिक्षक त्या त्या जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये हजर झालेले नाहीत. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडून होत आहे.
ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यात समान शिक्षक ठेवून बदल्या करण्याचे न्यायालयीन आदेश आहेत. त्यानुसार बदल्या करण्यात आल्या. पालघरकडून सुमारे १८ शिक्षक ठाणे जिल्ह्यात येणार होते. तर ठाण्याचे ४० शिक्षकांच्या पालघरला बदल्या झाल्या होत्या. यातीलही सुमारे २५ शिक्षक पालघरला हजर झाले नाहीत, पालघरचेही ठाण्यात आले नाहीत. मात्र, काही शिक्षक न्यायालयात गेल्यामुळे त्यावर सुनावणी सुरू आहे. सुमारे आठ दिवसात शिक्षकांच्या या बदल्यांचा हा प्रश्न निकाली निघण्याची अपेक्षा ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी व्यक्त केली.
शिक्षकांच्या बदल्यांच्या या समस्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर शिक्षण विभाग मात्र त्याविरोधात मूग गिळून आहे. यात मात्र गावखेड्यातील गरीब, कष्टकरी, शेतकºयांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास विलंब करणाºया या शिक्षकांवर कडक कारवाईची मागणीदेखील सदस्यांनी सर्वसाधारण सभेत लावून धरली. मात्र, अद्यापही प्रशासनाकडून त्यावर उपाययोजना केली नसल्याचे उघड झाले. शहापूर, भिवंडी आदी तालुक्यातील शिक्षक संबंधित शाळांवर हजर न झाल्यामुळे त्यांच्याकडून न्यायालयीन आदेशाचे उलंघन झाले. याविरोधात हजर झालेले शिक्षक मात्र न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारी आहेत.
शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान
मुरबाड तालुक्यात एक शिक्षक व तीन केंद्र प्रमुख हजर झाले नाहीत. त्यांना या तालुक्यात यायचे नसल्यामुळे त्यांनी येण्यास नकार दिला. अंशकालीन बदल्यांच्या नावाखाली या केंद्रप्रमुखांच्या बदल्या रद्द होण्याची शक्यता गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड यांनी व्यक्त केली. या केंद्रप्रमुखांमुळे मुरबाड पंचायत समितीच्या नियंत्रणातील टोकावडे, माळ व किशोर केंद्रांतील सुमारे ६० शाळांवरील नियंत्रणाची समस्या उद्भवली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.