इतिहास बदलणाऱ्यांवर कारवाई करा-मराठा नेते
By admin | Published: May 24, 2017 12:50 AM2017-05-24T00:50:34+5:302017-05-24T00:50:34+5:30
इंग्रजी माध्यमाच्या आयसीईएसच्या अभ्यासक्रमात तानाजी मालुसरे यांचेआडनाव बदलून सिंग असे दाखवून चुकीचा इतिहास सांगितला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : इंग्रजी माध्यमाच्या आयसीईएसच्या अभ्यासक्रमात तानाजी मालुसरे यांचेआडनाव बदलून सिंग असे दाखवून चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाच्यावतीने चुकीचा इतिहास लिहीणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी वसईच्या तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
आपल्या अद्भुत पराक्रमाने कोंढाणा किल्ला जिंकणाऱ्या तानाजी मालुसरे याचा सिंह असा गौरवपूर्ण उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. मालुसरे धारातीर्थ पडल्यानंतर गड आला पण सिंह गेला अशा शब्दात महाराजांनी दु:ख व्यक्त केले होते. हा इतिहास मात्र आयसीईएसच्या अभ्यासक्रमात बदलण्यात आला आहे. त्याच्या चौथीच्या पुस्तकात कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड कसे या प्रश्नावर तानाजी मालुसरे यांचे नाव सिंह होते, असे उत्तर देण्यात आले आहे.
मराठ्यांचा इतिहास बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. वसई विरार मराठा समाजाने याप्रकाराचा निषेध व्यक्त केला असून राजाराम मुळीक, कुमार धुरी, रत्नदीप बने, विश्वास सावंत, संजय पालव यांनी वसईच्या तहसिलदारांची भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी मराठ्यांचा इतिहास बदलणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. मराठ्यांचा गौरवशाली दैदिप्यमान इतिहास बदलता कामा नये. जर कुणी असा प्रयत्न करीत असेल तर तो हाणून पाडला पाहिजे. इतिहासाचा अभ्यास न करता पाठ्यपुस्तकामध्ये नको तो इतिहास लिहीणे म्हणजे भविष्यात येणाऱ्या पिढ्यांवर चुकीचे संस्कार करून त्यांना चुकीची माहिती देण्यासारखे असल्याचा आरोप मुळीक यांनी केला आहे. यासाठी सरकारने त्वरीत हस्तक्षेप करून अशा पुस्तकांवर बंदी घालण्याचीही मागणी केली.