कारवाई करा पण नासाडी नको!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:42 AM2018-12-08T00:42:39+5:302018-12-08T00:42:45+5:30
मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली
भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून त्यात फेरीवाल्यांच्या साहित्यासह त्यांच्या मालाची नासाडी केली जात आहे. यामुळे फेरीवाल्यांनी प्रशासनाला कारवाई करा, पण आमच्या मालाची नासाडी करू नका, अशी विनंती केली आहे. फेरीवाल्यांच्या आक्रोशाला फेरीवाला संघटनांनीही पाठिंबा दिला असून याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या काही वर्षांत फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांनी शहरातील मुख्य वाहतुकीचे रस्तेच अडवण्यास सुरुवात केली आहे. फेरीवाल्यांच्या या अतिक्रमणाला बाजारकरवसुली करणारे कंत्राटदार कारणीभूत असल्याचा आरोप होत असला, तरी त्याला खतपाणी स्थानिक राजकीय मंडळींकडूनच घातले जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
एका बाजूला फेरीवाल्यांवर कारवाईची तक्रार प्रशासनाकडे करायची, तर दुसऱ्या बाजूला होणारी कारवाई आर्थिक तडजोडीतून थांबवायची, अशा राजकीय दुतोंडीपणामुळे अधिकाºयांवर कामाचा प्रचंड ताण पडत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. शहरातील जटिल समस्यांपैकी एक असलेल्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांवर तत्कालीन महासभेत विशेष वेळ देण्यात आली होती. त्यात सर्वच नगरसेवकांनी आपापल्या क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करून काहींनी, तर आपली हप्तेखोरी झाकण्याचा प्रयत्न केला होता.
प्रशासनाने काही दिवसांपासून फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यात फेरीवाल्यांच्या हातगाड्या तोडल्या जात असल्याने फेरीवाल्यांमध्ये अगोदरच असंतोष असताना त्यांचा माल थेट रस्त्यावर फेकून त्याची नासाडी करायला सुरुवात केली आहे. पण, ही कारवाई ठरावीक ठिकाणच्याच फेरीवाल्यांवर होत असल्याने ती सर्वच फेरीवाल्यांवर नि:पक्षपणे केली जावी, अशी अपेक्षा फेरीवाल्यांकडून व्यक्त केली जात आहे. फेरीवाले प्रशासनाच्या कारवाईला विरोध करत नसले, तरी त्यांच्या साहित्यासह मालाची नासाडी मात्र अजिबात केली जाऊ नये, अशी मागणी फेरीवाल्यांकडून केली जात आहे. असा प्रकार थांबला नाही तर आंदोलनाचा असा इशारा दिला आहे.
>पालिकेने फेरीवाला धोरणानुसारच फेरीवाल्यांवर कारवाई करावी. त्याची अंमलबजावणी न करता प्रशासनाने फेरीवाल्यांच्या साहित्यासह त्यांच्या मालाची नासाडी करण्यास सुरुवात केली आहे. त्याला आमचा आक्षेप आहे. अनेकदा तर फेरीवाल्यांचा जप्त माल कारवाई करणाºयांपैकी काहीजण घरी घेऊन जात असल्याने त्याला आमचा विरोध असून ते त्वरित न थांबल्यास त्याविरोधात आम्ही तीव्र आंदोलन छेडू.
- अॅड. किशोर सामंत,
अध्यक्ष, जनवादी हॉकर्स सभा