मीरा भाईंदर मधील धोकादायक इमारतींवर पावसाळ्या आधी कारवाई करा, अन्यथा अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
By धीरज परब | Published: April 10, 2023 06:46 PM2023-04-10T18:46:43+5:302023-04-10T18:46:52+5:30
सोमवार १० एप्रिल रोजी आयुक्त ढोले यांनी शहरातील धोकादाय इमारतींचा आढावा व कारवाई बाबत आयुक्त दालनात बैठक घेतली .
मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील धोकादायक इमारती पडून दुर्घटना होणार नाही यासाठी पावसाळ्या आधी कारवाई करा अन्यथा संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल असा इशारा महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आहे .
सोमवार १० एप्रिल रोजी आयुक्त ढोले यांनी शहरातील धोकादाय इमारतींचा आढावा व कारवाई बाबत आयुक्त दालनात बैठक घेतली . बैठकीस उपायुक्त मारुती गायकवाड, अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी प्रभाकर म्हात्रे , योगेश गुणीजन , कांचन गायकवाड , सचिन बच्छाव , स्वप्नील सावंत आदी उपस्थित होते .
बैठकीत शहरातील धोकादायक इमारतीबाबत चर्चा केली . सर्व धोकादायक इमारतींना तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्त यांनी सर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना दिले . जिथे शक्य असेल त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट हे महानगरपालिकेच्या फंडातून करा .
स्ट्रक्चरल ऑडीट अहवालानुसार धोकादायक असलेल्या बांधकामांवर न्यायालयाचे आदेश तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पावसाळ्यापूर्वी कारवाई करा . कामात कुचराई, हलगर्जीपणा वा दुर्लक्ष केल्यास खपवून घेतले जाणार नाही . धोकादायक इमारतीवर वेळीच कारवाई न झाल्याने काही अनुचित घटना घडून जिवीत व वित्तहानी झाल्यास सबंधित अधिकाऱ्यास जबाबदार ठरवले जाणार अशी ताकीद आयुक्त ढोले यांनी अधिकाऱ्यांना दिली.