सातनंतर सुरू राहणाऱ्या दुकानांवर कारवाई करा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 12:09 AM2020-09-30T00:09:26+5:302020-09-30T00:09:56+5:30
आयुक्तांचे आदेश : ७२ आस्थापने सील
ठाणे : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सायंकाळी सातपर्यंत सर्व आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. महापालिकेनेही तशा प्रकारचे आदेश जारी केले आहेत. तरीही काही आस्थापना सायंकाळी सातनंतरही सुरू राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे सातनंतर ज्या आस्थापना उघड्या आहेत अशा आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश सोमवारी आयुक्तांनी दिले. दरम्यान, ७२ आस्थापने सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत सर्व साहाय्यक आयुक्तांनी रोज सायंकाळी सात ते साडेसात या कालावधीत आपल्या प्रभागामध्ये फिरून सातनंतर सुरू असणाºया तसेच ज्या ठिकाणी गर्दी होते अशा आस्थापना, अन्न पदार्थांच्या स्टॉल्सवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बैठक संपल्यानंतर महापालिकेने कारवाई सुरू करून काही दुकाने सील केली. शहरातील काही झोपडपट्टी भागात तसेच सोसायटीच्या ठिकाणी सातनंतरही दुकाने उघडी राहत असल्याचे दिसत होते. तर काही ठिकाणी नागरिक गर्दी करीत असताना दिसत होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करण्यात येत नसल्याने कोरोना वाढण्याचा धोका यामुळे वाढला असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते.
‘मास्कची सक्ती करा’
सर्व साहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या प्रभाग समिती अंतर्गत नागरिकांनी मास्कचा वापर करावा यासाठी जास्तीतजास्त जनजागृती करावी; तसेच नागरिकांना मास्कचा वापर करण्याची सक्ती करावी. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश त्यांनी दिले. या बैठकीला परिमंडळ उपायुक्त आणि सर्व साहाय्यक आयुक्त उपस्थित होते.