गोपनीय माहिती घेऊन खात्यातील रक्कम लंपास
By admin | Published: January 9, 2017 07:30 AM2017-01-09T07:30:11+5:302017-01-09T07:30:11+5:30
बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून आॅनलाइन फसवणुकीचा प्रकार शहापुरात येथे घडला. विनोद सापळे असे या फसलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो खर्डीजवळील पळशीण येथे राहणारा आहे.
शहापूर : बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून आॅनलाइन फसवणुकीचा प्रकार शहापुरात येथे घडला. विनोद सापळे असे या फसलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो खर्डीजवळील पळशीण येथे राहणारा आहे.
सापळे यांनी बहिणीच्या लग्नासाठी दीड लाख जमा केले होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्यांनी ते पैसे आपल्या बँक आॅफ बडोदाच्या शहापूर शाखेतील खात्यात जमा केले. गुरु वारी विनोद सापळे यांना एका नंबरवरून फोन आला. पलीकडील व्यक्तीने आपण स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सांगून जुन्या एटीएमकार्डऐवजी नवीन कार्ड हवे असल्यास त्या कार्डावरील पुढील आणि मागील बाजूची सगळी माहिती देण्यास सांगितले. सापळे यांच्या वडिलांचे म्हणजे भागवत सापळे यांचे एटीएमकार्ड बंद झाले होते. म्हणून, विनोद यांनी सगळी माहिती दिली.
या माहितीची खातरजमा करण्यासाठी आणखी एखादे एटीएमकार्ड असल्यास त्याचा नंबर मागितला. विनोद सापळे याने त्याच्या नावावरील बँक आॅफ बडोदाच्या एटीएमकार्डाचा नंबर आणि मागच्या बाजूचा नंबर दिला. ती माहिती देताच काही वेळानंतर बँक आॅफ बडोदाच्या खात्यातून कोणीतरी पैसे काढत असल्याचे लक्षात आले. थोडेथोडे करून एकूण ९८ हजारापर्यंत रक्कम काढून घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सापळे यांनी सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार केली आहे. बँकेसंदर्भातील कोणतीही गोपनीय माहिती कोणाला देऊ नये, याबाबत वारंवार जागृती करूनही अशा घटना घडतच आहेत. (वार्ताहर)