विद्यार्थ्यांच्या पासची भाडेवाढ मागे घ्या
By admin | Published: August 6, 2015 01:39 AM2015-08-06T01:39:24+5:302015-08-06T01:39:24+5:30
विद्यार्थ्यांच्या पासाकरिता केलेली तीनपट बेस्ट भाडेवाढ मागे घेण्याची सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बेस्ट प्रशासनाला केली आहे
मुंबई : विद्यार्थ्यांच्या पासाकरिता केलेली तीनपट बेस्ट भाडेवाढ मागे घेण्याची सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बेस्ट प्रशासनाला केली आहे. मंत्रालयात बुधवारी झालेल्या विशेष बैठकीदरम्यान अर्थमंत्र्यांनी ही सूचना केली असून, त्याचा ६५ हजार विद्यार्थ्यांना फायदा होईल, अशी माहिती भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
विद्यार्थ्यांच्या पासकरिताची बेस्ट भाडेवाढ मागे घेण्यात यावी, यासाठी अर्थमंत्र्यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्यासोबतही चर्चा केली. शिवाय त्यांनी बेस्टला याविषयीचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. बेस्टने विद्यार्थ्यांच्या पासची वाढ १ हजार ६०० रुपयांहून थेट ४ हजार ८०० रुपये एवढी केली होती. जून महिन्यापासून करण्यात आलेल्या भाडेवाढीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. पावसाळी अधिवेशनादरम्यानही लोढा यांनी ही भाडेवाढ रद्द करण्याची मागणी केली होती. दरम्यान, बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, सहकार मंत्री चंद्रकात पाटील, आमदार भारती लव्हेकर, आमदार सुनील शिंदे आणि बेस्टच्या अधिकारी वर्गासह पालक-विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)