अन्यायकारक पाणीदरवाढ मागे घ्या; ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 12:44 AM2020-03-13T00:44:35+5:302020-03-13T00:44:56+5:30
ठाण्यातील अर्थसंकल्प हा कोणतीही नवी योजना जाहीर करणारा नसून, मागच्याच योजना सुरू ठेवणारा स्थितीवादी व निराशावादी आहे
ठाणे : ठाणे महापालिकेने सादर केलेल्या मूळ अंदाजपत्रकात पाणीदरात ५० ते ६० टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. मात्र, ती अन्यायकारक असल्याचे सांगून सर्व लोकप्रतिनिधींनी फेटाळावी, अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाने केली आहे.
गेली अनेक वर्षे दरवाढ केली नाही म्हणून ती रास्त व योग्य आहे हा तर्क चुकीचा आहे. पाण्याच्या बिलांची वसुली पालिका करत नाही, हा त्यांचा गलथान कारभार झाला. त्यामुळे पाणी देण्याचा खर्च व उत्पन्न यात तफावत दिसत आहे. वस्तुत: पाणी, आरोग्य, परिवहन, रस्ते व दिवाबत्ती, तसेच साफसफाई माफक दरात करणे ही पालिकेची प्राथमिक व मुख्य जबाबदारी आहे, तसेच पाणीबिल वेळेवर न भरल्यास लावले जाणारे दंड व्याज हे प्रचंड दराने म्हणजे मासिक व्याज दराने लावले जाते. याला सर्वसामान्य नागरिकांच्या भाषेत पठाणी व्याज संबोधले जाते. त्यामुळे पाण्याच्या थकीत बिलावर लावण्यात येणारे व्याज हे वार्षिक दराने लावले जावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
महापालिका अर्थसंकल्प निराशावादी
ठाण्यातील अर्थसंकल्प हा कोणतीही नवी योजना जाहीर करणारा नसून, मागच्याच योजना सुरू ठेवणारा स्थितीवादी व निराशावादी आहे. वास्तविक महिलांच्या सार्वजनिक प्रसाधन व्यवस्थेची, खेळांच्या मैदानाची वानवा, तसेच पार्किंगसाठी नवी योजना, वाहतूककोंडी, परिवहन, शिक्षण व आरोग्य यासाठी कोणताही नवा उपाय व धोरण सुचविलेले नसल्याची टीकाही त्यांनी केली.