नगरसेवक सांभाळा, मग दावे करा, हेमंत म्हात्रे यांचे सेनेला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 01:07 AM2020-10-29T01:07:39+5:302020-10-29T01:07:51+5:30
Mira Bhayander : सरनाईक यांनी पालिकेत सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचार चालवला असल्याचे आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोसले उपस्थित होते.
मीरा राेड - मीरा-भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचे केवळ आरोपच शिवसेना करत असून त्यांना एकही भ्रष्टाचार सिद्ध करता आलेला नाही. पालिकेत सत्ता आणण्याचे दावे करण्याआधी स्वतःचे नगरसेवक सांभाळा. राज्यात तुमची सत्ता आहे ना , मग कोणी भ्रष्टाचार केला, याची चौकशी करा, असे थेट आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी दिले आहे.
आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर आमदार प्रताप सरनाईक व जैन यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी सरनाईक यांनी पालिकेत सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचार चालवला असल्याचे आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोसले उपस्थित होते.
म्हात्रे यांनी जैन यांच्यावर टीका केली. जैन या भाजपच्या महापौर होत्या, त्या काळात पण भ्रष्टाचार झाला का? त्या म्हणतात भाजपच्या सत्ताकाळात विकास झाला नाही, मग त्या महापौर असताना शहरासाठीच्या १३५ दशलक्ष लीटर पाणीयोजनेचे उद्घाटन झाले, सिमेंट रस्त्यांसाठी निधी मिळाला आदी विकासकामे झाली नाहीत का? असे सवाल म्हात्रे यांनी केले आहे. भविष्यात सेना-भाजपमध्ये विविध विषयांवरुन वाद हाेणार अशी चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु झाली आहे.
राज्यात भाजपची सत्ता येणार म्हणून त्या पुन्हा आल्या होत्या. प्रदेश नेतृत्वाशी संपर्कात होत्या. स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही. त्या भाजपसोबत होत्या म्हणतात, तर महापौर निवडणुकीत पक्षाच्या विरोधात मतदान कसे केले? त्यांच्यासोबत एकही नगरसेवक शिवसेनेत गेला नसून अश्विन कसोदरिया, विजय राय यांनी सभापती निवडणुकीत भाजपलाच मतदान केले आहे. त्यांनी सरनाईक यांच्यावरही टीका केली. सेनेचे अनेक आजीमाजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपमध्ये आले आहेत. आणखीही भाजपच्या वाटेवर आहेत, असा दावा केला.