रुग्णांच्या तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:32 AM2021-04-29T04:32:04+5:302021-04-29T04:32:04+5:30
ठाणे : कोविडचा सामना करण्यासाठी ठाणे मनपाची यंत्रणा सर्वोपरी प्रयत्न करीत आहे. कोविडसंदर्भात उपलब्ध ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आदी ...
ठाणे : कोविडचा सामना करण्यासाठी ठाणे मनपाची यंत्रणा सर्वोपरी प्रयत्न करीत आहे. कोविडसंदर्भात उपलब्ध ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आदी माहिती आणि सूचना देण्यासाठी सुरू केलेल्या कोविड वॉर रूमला बुधवारी मनपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी भेट दिली. या वेळी कोणत्याही परिस्थितीत रुग्णांच्या तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले. या वेळी आयुक्तांनी वॉर रूमच्या फोनवर स्वतः फोन करून सर्व फोन सुरू असल्याची खात्री केली.
कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, उपलब्ध हॉस्पिटलची माहिती तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी मनपाने वॉर रूम सुरू केली आहे. वॉर रूमचे १० संपर्क क्रमांक दिले असून, नागरिकांनी त्यावर संपर्क साधल्यास त्यांना शहरातील उपलब्ध जवळचे रुग्णालय, उपलब्ध खाटा, रुग्णवाहिका आदी माहिती तत्काळ देण्याची व्यवस्था केली आहे. या वॉर रूमध्ये २४ तास अधिकारी, डॉक्टर आणि डेटा ऑपरेटर्स नियुक्त केले आहेत. या वॉर रूमचा आढावा घेण्यासाठी बुधवारी दुपारी मनपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी वॉर रूमला भेट दिली. या वेळी त्यांनी सर्व डेटा ऑपरेटरशी संवाद साधत स्वतः सर्व मोबाइल नंबर चालू असल्याची खात्री करून घेतली. रुग्णांच्या तक्रारींना प्राधान्य द्यावे, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये, बेड उपलब्धतेची अचूक माहिती द्यावी, अशा सूचना त्यांनी वॉर रूममधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. या वेळी उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, कार्यकारी अभियंता रामदास शिंदे आदी उपस्थित होते.
वॉर रूमशी या क्रमांकावर साधा संपर्क
मनपाने वॉर रूममध्ये तीन सत्रांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नागरिकांनी ९१-८६५७९०६७९१, ९१-८६५७९०६७९२, ९१-८६५७९०६७९३, ९१-८६५७९०६७९४, ९१-८६५७९०६७९५, ९१-८६५७९०६७९६, ९१-८६५७९०६७९७, ९१-८६५७९०६७९८, ९१-८६५७९०६८०१ आणि ९१-८६५७९०६८०२ या क्रमांकांवर संपर्क साधावा. दरम्यान, एखादा क्रमांक व्यस्त लागल्यास नागरिकांनी दुसऱ्या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन मनपाने केले आहे.
--------