प्लाझ्मा देऊन माणुसकीचे चॅलेंज घ्या; झेप प्रतिष्ठानचे ७४ जणांना प्लाझ्मादान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 11:42 PM2021-04-24T23:42:19+5:302021-04-24T23:42:32+5:30
संकटकाळात मदत करण्यासाठी झेप प्रतिष्ठान उतरली आहे.
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली असल्याने त्यांना प्लाझ्मा साठी वणवण भटकावे लागत आहेत. यातच झेप प्रतिष्ठानने गेल्या वर्षीप्रमाणे प्लाझ्मा दान साठी माणुसकीचे चॅलेंज घेतले आहे. संकटात मदतीचा हात देणाऱ्या या संस्थेने एप्रिल महिन्यात ७४ रुग्णांना प्लाझ्मा मिळवून दिला आहे. प्लाझ्मा दान करा माणुसकीचे चॅलेंज घ्या, असे आवाहन संस्थेने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
संकटकाळात मदत करण्यासाठी झेप प्रतिष्ठान उतरली आहे. संस्था ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक भागात विविध संस्था व ब्लड बँक आणि प्लाझ्मा दात्यांकडून मदत मिळवून रुग्णांना हॉस्पिटल बेड्स, प्लाझ्मा, रक्त, ॲम्ब्युलन्स आणि इंजेक्शन मिळवून देण्यात कसोशीने प्रयत्न करीत आहे. गेल्या १५ दिवसात तब्बल ७४ जणांना प्लाझ्मा, २४ बेड, १७ इंजेक्शन तसेच २ रक्तदाते दिले आहेत. २४ तास सात दिवस सतत मदतीसाठी तयार असणाऱ्या झेप प्रतिष्ठानला दिवसाला १०० फोन येत आहेत. पण रुग्णांच्या वाढलेल्या आकड्याने सर्वच सुविधांवर ताण येत असून भरपूर वेळा रुग्णांना नाही सुद्धा म्हणावे लागते, अशी खंत झेप प्रतिष्ठानचे विकास धनवडे यांनी
व्यक्त केली.
प्लाझ्मा दान याविषयी जनजागृती होण्याकरिता सोशल मीडिया तसेच लोकचळवळीतून झेप प्रतिष्ठानचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सरकारने ही त्यांच्या परीने जास्तीत जास्त प्लाझ्मा दान साठी जागृती करणे गरजेचे आहे. कोरोनातून बरे झालेले रुग्ण काही बाबींच्या पूर्तता केल्यावर किमान दोन रुग्णांचे प्राण वाचवू शकतात. त्यामुळे बरे झालेल्या लोकांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करून कोरोनाशी झुंजत असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवावे, असे आवाहन झेप प्रतिष्ठानने केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आई-मुलाने केले पाच वेळा प्लाझ्मादान
ठाण्यातील उज्ज्वला जाधव आणि त्यांचा मुलगा अनुराग जाधव यांना कोरोना झाला होता. पण २८ दिवसांनंतर दोघांनी मिळून पाच वेळा प्लाझ्मादान करून पाच जणांचे जीव वाचवले आहेत.