अल्पवयीन चालकांवर कठोर कारवाई करा; रिक्षा युनियनची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 12:54 AM2019-07-27T00:54:14+5:302019-07-27T00:54:48+5:30
रिक्षा युनियनने केली आरटीओकडे मागणी : सुविधा न मिळाल्यास आंदोलन
डोंबिवली : रिक्षाचालकांमध्ये अल्पवयीन मुले दिसताच त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करा. नियम धाब्यावर बसवून कोणी रिक्षा चालवत असेल, तर संबंधितांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी डोंबिवली पश्चिमेकडील रिक्षा-चालक-मालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांच्याकडे केली. त्याचवेळी वाहनांची तपासणी, पासिंगसाठी रिक्षाचालकांना असुविधांचा सामना करावा लागत असल्याचे सांगून यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ससाणे आणि युनियन यांच्यात कल्याणमध्ये गुरुवारी बैठक झाली. त्यावेळी युनियनचे अंकुश म्हात्रे, शेखर जोशी, भिकाजी झाडे, कैलास जाधव, उदय शेट्टी आदींसह रिक्षाचालक उपस्थित होते. आमच्या रिक्षाचालकांना पासिंगसाठी तासन्तास थांबावे लागत आहे. पहिल्या दिवशी पासिंग न झाल्यास दुसºया, तिसºया दिवशीही फेरी मारावी लागत आहे. त्यामुळे नांदिवली येथील नव्या जागेतील असुविधा लवकर दूर कराव्यात, अशी मागणी युनियनतर्फे करण्यात आली आहे.
जोशी म्हणाले की, आरटीओकडे असुविधांबाबत वारंवार तक्रारी करूनही काहीच झालेले नाही. त्यामुळे रिक्षाचालकांना व्यवसायाचा खाडा करावा लागत आहे. याआधीही ससाणे यांची भेट घेऊ न याबाबत तक्रारी केल्या होत्या. तसेच २५ जूनला आरटीओ अधिकाऱ्यांना पत्रही दिले; मात्र त्यात कुठलीच सुधारणा झालेली नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, मनसेच्या वाहतूकसेनेतर्फेबुधवारी आरटीओला निवेदन देण्यात आले. फेरीवाला, वाहतूककोंडी, पत्रीपूलकोंडी, मुरबाडच्या काळ्या-पिवळ्या जीपचा बेकायदा थांबा याबाबत अधिकाºयांना प्रत्यक्ष निवेदन दिले. यावर सात दिवसांत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. त्यावेळी कल्याण महिला शहराध्यक्ष शीतल विकेनकर, चेतना रामचंद्रन, शहर सचिव अर्चना चेंदरकर, अमित घमंडी, गणेश सोनावणे यांच्यासह महिला व पुरु ष पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.
जोशी, म्हात्रे यांच्यासह युनियन पदाधिकाºयांनी माझी भेट घेतली. पासिंगसाठी रिक्षाचालकांना वेळ वाढवून देण्यात येईल, तसेच युनियनच्या अन्य मागण्यांबाबत प्राधान्यक्र म देत सगळ्याच रिक्षाचालकांच्या समस्या सोडवण्यात येतील. नांदिवली सेक्शन आताच सुरू झाले आहे. थोडे सहकार्य करावे, तिथेही सुविधा मिळतील. - संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण