साध्या वाहनातून नको तर विमानाने लखनौला न्यावे: दुबेच्या साथीदारांची ठाणे न्यायालयात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 01:50 AM2020-07-13T01:50:57+5:302020-07-13T01:54:55+5:30

कुख्यात गुंड विकास दुबे याच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या थरारनाटयानंतरचा पूर्वानुभव लक्षात घेता कुठेही एखादा अपघात होऊ नये, यासाठी ठाण्यात पकडलेल्या दुबे याच्या दोन्ही साथीदारांना साध्या वाहनाऐवजी थेट विमानाने लखनौ येथे नेण्यात यावे, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली. उत्तरप्रदेश पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी येईपर्यंत त्यांची नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Take Dubey's accomplices to Lucknow court, not by simple vehicle but by plane | साध्या वाहनातून नको तर विमानाने लखनौला न्यावे: दुबेच्या साथीदारांची ठाणे न्यायालयात मागणी

आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली मागणी

Next
ठळक मुद्दे२१ जुलैपर्यंत मिळाली पोलीस कोठडीआरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली मागणीतूर्त नवी मुंबईच्या तळोजा न्यायालयात झाली रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबे याच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या थरारनाटयानंतरचा पूर्वानुभव लक्षात घेता कुठेही एखादा अपघात होऊ नये, यासाठी ठाण्यात पकडलेल्या दुबे याच्या दोन्ही साथीदारांना साध्या वाहनाऐवजी थेट विमानाने लखनौ येथे नेण्यात यावे, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली. दरम्यान, या दोघांनाही आता २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
दुबे याचे साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी (४६)आणि सुशील कुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी (३०) या दोघांना शनिवारी मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने ठाण्यातून ११ जुलै रोजी अटक केली. त्यांना रविवारी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश रश्मी झा यांनी या दोघांनाही न्यायालयीन कोठडी दिली. उत्तरप्रदेश पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी येईपर्यंत त्यांना नवी मुंबईच्या तळोजी मध्यवर्ती कारागृहात ठेवले जाणार आहे.
दरम्यान, दोघांनाही वाहनातून कानपूर येथे घेऊन जाण्याऐवजी हवाई मार्गे विमानातून लखनौ हवाईतळावर नेण्यात यावे, अशी मागणी आरोपी त्रिवेदी आणि तिवारी यांचे वकील अनिल जाधव यांनी ठाणे न्यायालयात अर्जाद्वारे केली. त्यांची कोरोना टेस्टही केली जाणार आहे. त्यानंतर त्यांचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना दिला जाणार असल्याची माहिती निरीक्षक नायक यांनी दिली. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात विकास दुबे हा मोस्ट वॉन्टेड होता. तो पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेल्यानंतर त्याचे साथीदार पसार झाले होते. त्यांच्यापैकीच दोघे ठाण्याच्या कोलशेत, ढोकाळी परिसरातील एका चाळीत लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी दोघांनाही नायक यांच्या पथकाने अटक केली.
विकास दुबेला नेतांना वाहनाला झालेला अपघात तसेच सध्याचा कोरोनाच्या प्रादुर्भावाची गंभीर स्थिती लक्षात घेता आरोपींच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच ठाणे न्यायालयाकडे आरोपींना विमानाने पोलिसांनी लखनौला घेऊन जाण्याची विनंती केल्याचेही अ‍ॅड. जाधव यांनी सांगितले.

Web Title: Take Dubey's accomplices to Lucknow court, not by simple vehicle but by plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.