निवडणूक घ्या, अन्यथा आंदोलन करू; परिवहन सभापती निवडणूक रद्दच्या निर्णयावर भाजपा आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 05:03 PM2020-07-28T17:03:05+5:302020-07-28T18:03:15+5:30
सोमवारी आमदार रविंद्र चव्हाण यांच्याबरोबर केलेल्या चर्चेनंतर कोकण आयुक्तांना निवडणूक घेण्यासंदर्भात निवेदन देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
कल्याण: कोरोनाच्या प्रादुर्भावात रखडलेली परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक ऑनलाईन प्रक्रियेद्वारे होणार होती. यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्त लौकेश चंद्र यांनी परिपत्रक जारी केले होते. परंतू शुक्रवारी नवे आदेश काढत निवडणूक रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाला भाजप सदस्यांनी हरकत घेतली असून निवडणूक घ्या अन्यथा आंदोलन छेडावे लागेल असा आक्रमक पवित्र त्यांनी घेतला आहे. सोमवारी आमदार रविंद्र चव्हाण यांच्याबरोबर केलेल्या चर्चेनंतर कोकण आयुक्तांना निवडणूक घेण्यासंदर्भात निवेदन देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
सभापती निवडीची सभा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात येणार होती. ऑनलाईन पध्दतीने होणारी ही निवडणूक राज्यातील पहिलीच निवडणूक ठरणार होती. दरम्यान ऑनलाईन प्रक्रियेला सभापती मनोज चौधरी यांनी मात्र हरकत घेतली होती. ठाणो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड जशी करण्यात आली तशीच लोकशाही पध्दतीने निवडणूक घ्या असे पत्र त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांना पाठवले होते. दरम्यान महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या स्थायी समिती, विषय समितीच्या निवडणूका, सदस्य निवडणूका पुढील आदेशार्पयत स्थगित करणोबाबत निर्देश आहेत त्याप्रमाणो पुढील आदेशार्पयत परिवहन समिती सभापती निवडणूक रद्द करण्यात येत असल्याचे कोकण विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. परिवहन समितीमधील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत.
समितीमधील शिवसेनेचे सदस्य मधुकर यशवंतराव यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाल्याने शिवसेनेची एक जागा रिक्त आहे. दरम्यान स्थायी समिती सभापती हा परिवहन समितीचा पदसिध्द सदस्य असतो. स्थायी समिती सभापतीपद भाजपकडे आहे. संख्याबळाच्या आधारे सभापतीपदाच्या निवडणूकीत भाजपचेच पारडे जड आहे. परंतू निवडणूक रद्द झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. मात्र आता भाजप सदस्यांनी निवडणूक ही झालीच पाहिजे असा आक्रमक पवित्र घेतला आहे. सदस्यांनी भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रविंद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत निवडणूक घेण्याची मागणी करणारे पत्र कोकण विभागीय आयुक्तांना देण्याचे ठरले आहे. जर निवडणूक नाही घेतली तर आंदोलनाचा पवित्र घेण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे अशी माहीती परिवहन सदस्य संजय मोरे यांनी दिली.