श्रीगोवर्धननाथ मंदिर वास्तूचा चांगला सांभाळ करा: पोलीस आयुक्तांनी टोचले विश्वस्तांचे कान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 10:20 PM2018-09-09T22:20:45+5:302018-09-09T22:35:35+5:30
श्रीगोवर्धननाथ मंदिरात चोरीचा प्रसंग पुन्हा उद्भवू नये, याची योग्य ती खबरदारी विश्वस्तांनी घ्यावी, असा सल्ला ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी रविवारी पोलिसांच्या सत्कार कार्यक्रमात मंदिर विश्वस्तांना दिला.
ठाणे: श्रीगोवर्धननाथ मंदिरातील चोरीनंतर मोठया मेहनतीने ठाणे पोलिसांनी सीसीटीव्ही तसेच इतर धागेदोऱ्यांच्या आधारे चोरटयांना पकडून ४० लाखांचा ऐवज हस्तगत केला. या मंदिरात चोरीचा प्रसंग पुन्हा उद्भवू नये, याची योग्य ती खबरदारी विश्वस्तांनी घ्यावी, असा सल्ला ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी रविवारी एका कार्यक्रमात दिला.
खारकर आळीतील १५० वर्षे पुरातन श्री गोवर्धननाथ मंदिरातील सुमारे ४० लाखांच्या दागिने आणि भांडयाचा यशस्वीपणे तपास करणाºया ठाणे पोलिसांचा वैष्णव मंदिर ट्रस्टच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयुक्तांनी हे मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, पुरातन मंदिर असल्यामुळे त्या मंदिरांशी गुजराथी बांधवांच्या भावनांचे नातेही तितकेच घट्ट आहे. त्यामुळेच ठाणे पोलिसांसमोर हे एक आव्हान होते. परंतू, ठाणे पोलिसांनी अत्यंत चिकाटी, आत्मविश्वास आणि मेहनतीने चोरटयांसह हे दागिने परत मिळविले. त्यामुळे ठाणे शहरातील आता सर्वच मंदिरांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची सूचना यानिमित्ताने उपायुक्तांना केल्याचे त्यांनी सांगितले. आपणही योग्य प्रकारे मंदिर आणि तेथील दागिन्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी वैष्णव मंदिर ट्रस्ट विश्वस्तांना आभार स्विकारतांनाच केले.
चांगले काम केल्यानंतर पोलिसांना प्रोत्साहन देणे, ही चांगली बाब असून पोलीसही समाजाचाच घटक आहेत. समाजानेही त्यांना समजून घेतले पाहिजे, असे आवाहन यावेळी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले. उपायुक्त डी. एस. स्वामी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
असा झाला सत्कार...
यावेळी वैष्णव मंदिर ट्रस्टचे विश्वस्त रविकांत थानावाला यांनी पोलीस आयुक्त फणसळकर यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. तर उपायुक्त डी. एस. स्वामी यांचा पियुष थानावाला, नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांचा संजय थानावाला, ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांचा राजेश थानावाला यांनी तर निरीक्षक अजय साबळे यांचा हालाई लोहाना इवेंट ग्रृपचे अध्यक्ष केतन ठक्कर यांनी सत्कार केला. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस नाईक प्रविण बांगर, तुषार जयतकर आणि हवालदार विजय हिंगे यांनाही यावेळी गौरविण्यात आले. पोलीस आयुक्तांच्या पत्नी मेधा फणसळकर यांचा ट्रस्टच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. वासंती गोकाणी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.