अतिधोकादायक इमारतींवर तत्काळ कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:41 AM2021-05-19T04:41:29+5:302021-05-19T04:41:29+5:30
ठाणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सी-१ या वर्गवारीतील अतिधोकादायक इमारती खाली करून त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त ...
ठाणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सी-१ या वर्गवारीतील अतिधोकादायक इमारती खाली करून त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांना मंगळवारी दिले. त्याचबरोबर शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
शहरात पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारतींमुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी आयुक्तांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रभाग समितीनिहाय सी १, सी २, आणि सी २ अ गटातील धोकादायक इमारतींचा आढावा घेतला. प्रभाग समितीनिहाय धोकादायक इमारतींची यादी ठाणे महानगरपालिकेने यापूर्वीच जाहीर केली आहे. तसेच सद्यस्थितीत रस्त्यांच्या दुरुस्तीची जी कामे सुरू आहेत ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसेच घनकचरा विभागाच्या वतीने प्रत्येक प्रभाग समितीनिहाय साफसफाई करण्यासोबत शहरातील संपूर्ण नालेसफाई ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाला ज्या ठिकाणी चेंबरवर झाकणे नाहीत तेथे तत्काळ ती बसविणे, चर बुजविणे व खड्डे बुजविण्याच्या सूचनाही केल्या. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यावर पावसाच्या पाण्याने कचरा वाहून आला असून झाडांच्या पडलेल्या फांद्या, कचरा तत्काळ उचलण्यास सांगितले.