कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तातडीने उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:30+5:302021-05-20T04:43:30+5:30
ठाणे : कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट थोपविण्यात ठाणे महापालिका प्रशासनाला यश आले आहे. परंतु, आता कोरोनाची तिसरी ...
ठाणे : कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट थोपविण्यात ठाणे महापालिका प्रशासनाला यश आले आहे. परंतु, आता कोरोनाची तिसरी लाटदेखील येणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक धोका हा लहान मुलांना होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोणातून ठाणे महापालिकेने काय काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बुधवारी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली.
बालरोग तज्ज्ञांशी चर्चा - विनिमय करून, वेबसंवाद साधून त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून नियोजन करणे गरजेचे असून, त्यानुसार आता पुढील उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना फटका बसू शकेल, असे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याबाबत राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. तसेच स्थायी समिती सभेमध्ये सदस्यांनी याबाबत विचारणा केलेली आहे. सद्य:स्थितीत चालू असलेले ग्लोबल, पार्किंग प्लाझा या कोविड सेंटरबरोबर अजून नव्याने सुरू होत असलेल्या दोन सेंटरमध्ये लहान मुलांना बेड तसेच ऑक्सिजन मशीनची पुरेशी व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेची वाट न पाहता त्यापूर्वी लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.