एकत्रित विकास योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा : किसन कथोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:43 AM2021-03-09T04:43:23+5:302021-03-09T04:43:23+5:30
माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर आणि सहकार भारतीने काटदरे मंगल कार्यालयात पुनर्विकास कार्यशाळेचे आयोजन रविवारी केले होते. कार्यशाळेत अनेक सोसायट्यांच्या ...
माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर आणि सहकार भारतीने काटदरे मंगल कार्यालयात पुनर्विकास कार्यशाळेचे आयोजन रविवारी केले होते. कार्यशाळेत अनेक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या शंका व्यक्त केल्या. कोरोनामुळे या कार्यशाळेत फक्त ४० पदाधिकारी उपस्थित होते. मात्र कार्यशाळा ऑनलाईन असल्याने अनेकांनी त्याचा लाभ घेतला.
राज्यातील रखडलेल्या पुनर्विकासाला आता खऱ्या अर्थाने चालना मिळाली असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. या कायद्याचा अशा कार्यशाळेमधून प्रचार होत आहे. याचा जास्तीत जास्त सोसायट्यानी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात एकत्रित विकास कायदा पहिल्यांदाच आला आहे. यामुळे ज्या भागात लहान रस्ते असतील अशा ठिकाणच्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास होत नव्हता, तो या नवीन कायद्यामुळे निश्चित होणार आहे असे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नयन देढिया यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर असावे हे धोरण आहे. यासाठी फडणवीस यांनी राज्यात एकत्रित विकास धोरण कायदा मंजूर केला. या कायद्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी ही कार्यशाळा आयोजित केल्याचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी सांगितले. बदलापूर शहरात तीन हजारापेक्षा अधिक इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचा पुनर्विकास व्हावा यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वानी विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहनही पातकर यांनी यावेळी केले.
----------------------------------------------------