‘औषधफवारणी कामगारांना कामावर घ्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 06:16 AM2018-04-07T06:16:41+5:302018-04-07T06:16:41+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेने आर्थिक दिवाळखोरीचे कारण देत एकात्मिक डासनिर्मूलन योजनेंतर्गत औषधफवारणी करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले.
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने आर्थिक दिवाळखोरीचे कारण देत एकात्मिक डासनिर्मूलन योजनेंतर्गत औषधफवारणी करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले. याला जबाबदार असणा-या अधिका-यांवर त्वरित कारवाई करा, तसेच कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा सामावून घेण्याचे निर्देश स्थायी सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी दिले.
एकात्मिक डासनिर्मूलन योजनेच्या लेखाशीर्षकाखाली आरोग्य विभागाकडून दरवर्षी सुमारे १० कोटींची केवळ औषधेच खरेदी केली जातात. तर, कामगारांच्या वेतनापोटी दोन कोटी खर्च होतात. मात्र, प्रस्तावित तरतुदीत प्रशासनाने सुमारे १० कोटींची कपात करून केवळ दोन कोटींचीच तरतूद एकात्मिक डासनिर्मूलनासाठी केली. त्यामुळे फवारणीच्या वार्षिक खर्चाबाबत आरोग्य विभाग चिंताग्रस्त होता. त्यात स्थायी समितीने एक कोटींची वाढ केली.
तरीही, औषधफवारणीचा खर्च भागवणे दुरापास्त होणार असल्याने आरोग्य विभागाने औषधफवारणी करणाºया सर्व १५१ कर्मचाºयांवर संक्रांत आणण्याचा निर्णय घेतला. पुरेशा निधीअभावी कामगारांसह ३० कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढून टाकले.
औषधफवारणीसाठी आवश्यक निधी आरोग्य विभागाने प्रस्तावित केला असताना तो प्रशासनानेच कमी केल्याचा आरोप त्यांनी केला. कमी केलेल्या तरतुदीत उलट स्थायीने ५० टक्के वाढ करूनही स्थायीच्या बदनामीचे षड्यंत्र रचण्यात आल्याने पाटील यांनी अधिकाºयांचा समाचार घेतला.
औषधफवारणीसाठी १०० गृहनिर्माण संस्थांनी पालिकेशी पत्रव्यवहार केला. त्यामुळे आयुक्त बळीराम पवार यांनी त्या कामगारांना नवीन कंत्राटात प्राधान्याने सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.