पैसे घेऊन ठामपात ठेकेदारांची मोठी बिले अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:46 AM2021-08-18T04:46:50+5:302021-08-18T04:46:50+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना दुसरीकडे छोट्या ठेकेदारांची बिले थांबवून मोठ्या ठेकेदारांना कोट्यवधीचे बिले पैसे घेऊन ...
ठाणे : ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना दुसरीकडे छोट्या ठेकेदारांची बिले थांबवून मोठ्या ठेकेदारांना कोट्यवधीचे बिले पैसे घेऊन अदा केली असल्याचा खळबळजनक आरोप सभागृह नेते अशोक वैती यांनी मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत केला. त्यांच्या आरोपानंतर या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
कोरोनामुळे ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाल्याने ठेकेदारांना बिले अदा केलेली नाहीत. ती अदा करण्यासाठी यापूर्वी ठेकेदारांनी ठाणे महापालिकेविरोधात आंदोलनही केले होते. काहींनी काम बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र, असे असताना वैती यांनी मात्र ठेकेदारांना अदा केलेल्या बिलांसंदर्भात मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा गंभीर आरोप केला. एकीकडे छोट्या ठेकेदारांची बिले बजेट नसल्यामुळे अडवली जातात. मात्र, दोन ते तीन कोटींची मोठ्या ठेकेदारांची बिले अदा केली असून, ती पैसे घेऊन अदा केल्याचा आरोप त्यांनी केला.
या आरोपांनंतर काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. महापौर नरेश म्हस्के यांनीदेखील चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या वादावर अखेर पडदा पडला.