मिरवणूका उत्साहात करा, पण आवाज मर्यादेत ठेवा - पालकमंत्री शंभुराज देसाई
By जितेंद्र कालेकर | Published: September 26, 2023 08:37 PM2023-09-26T20:37:57+5:302023-09-26T20:39:17+5:30
गणेश विसर्जनासाठी ठाणे जिल्ह्यात १८ हजार पोलिसांचा बंदोबस्त
ठाणे: गणेश विसर्जन मिरवणूका उत्साहात करा, पण कोणत्याही वाद्यांचा आवाज हा दिलेल्या मर्यादेतच ठेवा, असा सल्ला ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी मंगळवारी ठाण्यात दिला. विसर्जन मिरवणूकीला ठाणे जिल्हाभर १८ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याचे संपूर्ण नियोजन केल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. लागोपाठ आलेल्या गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांसह जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत यावेळी दिल्या.
गणेश विसर्जन आणि ईद मिरवणूकीच्या आढाव्यासाठी पालकमंत्री मंगळवारी ठाण्यात आले होते. त्यावेळी ते बाेलत हाेते. ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह, ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मीरा भार्इंदरचे पोलिस आयुक्त मधुकर पांडेय आदी यावेळी उपस्थित हाेते. जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, केलेल्या उपाययोजना, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, विसर्जनस्थळाच्या सुविधा याबद्दल सर्व पोलीस आयुक्तालये व महापालिकांकडून माहिती घेत एकमेकांनी समन्वय ठेवण्याच्या सूचना यावेळी केल्या.
अनंत चतुर्दशीला हाेणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूका निर्विग्नपणे पार पडण्यासाठी ठाणे आयुक्तालयासह जिल्हाभर १८ हजार पोलिस अधिकारी कर्मचारी तसेच राज्य राखीव दलाच्या पाच तुकडया, दंगल नियत्रंण पथकांसह गृहरक्षक दल आदींचा माेठा बंदोबस्त राहणार आहे. त्याशिवाय वैद्यकीय पथक, स्वयंसेवकही मदतीसाठी आहेत. सुमारे दोन हजारांहून अधिक सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन गुरुवारी सायंकाळी ४ ते शुक्रवारी पहाटे ४ पर्यंत हाेणार आहे. लगेच दुसऱ्या दिवशी ईद मिरवणूकाही असल्यामुळे पोलिसांना याचा अतिरिक्त ताण असून सलग ४८ तासांची डयूटी असेल. त्यामुळेच गणपती आणि ईद या दोन्ही मिरवणूका शांततेत पार पडण्यासाठी नियोजन केले आहे. कोणत्याही उत्सवाला आडकाठी राहणार नाही. मात्र कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजे किंवा अन्य कोणत्याही वाद्याच्या आवाजाची मर्यादा पाळली जावी, असे आवाहनही त्यांनी केले. विसर्जन मिरवणूकांपूर्वीच रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
२० हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई-
गणेश मिरवणूकीलाही साध्या वेषातील पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून सीसीटीव्ही, द्रोण कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. आतापर्यंत २० हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती यावेळी ठाणे पोलिसांनी दिली.
६५ हजार विर्द्याीनींचे समुपदेशन
ठाणे शहर आयुक्तालयात महिला सबलीकरण ही साताराऱ्याच्या धर्तीवर पथदशीर् याेजना सुरु केली आहे. शाळा, महाविद्यालयातील ६५ हजार विर्द्याीनींचे समुपदेशन आतापर्यंत केले आहे. यात सायबर, वाहतूक आणि महिलांसंबंधींच्या गुन्हयांबाबत जनजागृती करण्यासाठी ३५ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गणेश मिरवणूकीलाही साध्या वेषातील पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून सीसीटीव्ही, द्रोण कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. आतापर्यंत २० हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती यावेळी ठाणे पोलिसांनी पालकमंत्र्यांना दिली.
शिंदे सेना डरती नहीं- देसाई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला परदेश दौरा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आमदार अपात्रतेबाबत शिंदे सेना घाबरल्याबाबत उल्लेख केला हाेता. त्यावर पत्रकारांनी छेडले असता, शिंदे सेना डरती नहीं, असे देसाई यांनी स्पष्ट केले. तर ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागेबाबतही भाजप आणि शिवसेना एकत्रित निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.