परस्पर रुग्ण भरती करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 01:12 AM2020-07-29T01:12:59+5:302020-07-29T01:16:50+5:30
महापौरांनी केली मागणी : आयुक्तांना लिहिले पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मनमानी कारभार करणाºया खासगी रुग्णालयांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे अभिनंदन करून महापौर नरेश म्हस्के यांनी शहरातील काही खासगी रुग्णालये कोविड वॉररूमसह आरोग्य सेवेला न कळवता परस्पर कोविड रुग्ण भरती करून घेत असल्याची चूकही लक्षात आणून दिली आहे. अशा रुग्णांलयावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रात केली आहे.
सरकारचे नियम न पाळणाºया व अवाजवी बिल आकारून रुग्णांची लूट करणाºया रुग्णालयांना ‘होरायझन’ वरील कारवाईमुळे चाप बसणार आहे. पण काही रुग्णालये कोविड वॉररूम, आरोग्य सेवेला न कळवता परस्पर रुग्ण भरती करून घेत आहेत. मनपाचे सर्व रुग्णालयांवर नियंत्रण राहावे, यासाठी वॉररूम सुरू केली आहे. परंतु, तेथे न कळवताच काही रुग्णालये रुग्ण दाखल करत असल्याचे ते म्हणाले.
महात्मा जनआरोग्य योजनेसाठी स्वतंत्र अधिकारी नेमा
शहरातील काही खासगी रुग्णालये शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व रेशनकार्डधारकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत सामावून घेत नाही, असेही त्यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले.
त्यातही अनेक रुग्णालये लपवाछपवी करीत असल्यामुळे गरीब रुग्णांना याचा फायदा मिळत नाही. परिणामी रुग्णांकडून अवाजवी बिल आकारणी केली जात आहे. याबाबतही प्रशासनाने अशाच प्रकारे कठोर भूमिका घेऊन सर्व खासगी रुग्णालयांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
जी रुग्णालये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णाला देणार नाहीत, अशा रुग्णालयांवर ही कारवाई करावी, तसेच या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी खास अधिकाºयाची नियुक्ती करावी, असेही त्यांनी सुचविले आहे.