थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा
By Admin | Published: February 15, 2017 04:32 AM2017-02-15T04:32:27+5:302017-02-15T04:32:27+5:30
पाणीपट्टी व मालमत्ताकराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा, असा आदेश केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन
कल्याण : पाणीपट्टी व मालमत्ताकराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा, असा आदेश केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी सोमवारी साप्ताहिक आढावा बैठकीत पाणीपुरवठा, करनिर्धारक संकलक आणि प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिला. या बैठकीत पाणीबिलापोटी आतापर्यंत झालेल्या वसुलीची माहिती आयुक्तांनी घेतली. या वेळी त्यांनी थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या.
२०१६-१७ च्या अंदाजपत्रकानुसार कर, पाणीपुरवठा आणि नगररचना विभाग यांना करवसुलीची उद्दिष्टे देण्यात आली आहेत. परंतु, जानेवारी २०१७ अखेर दिलेले उद्दिष्ट न गाठल्यामुळे महापालिकेतील सर्व विभागीय उपायुक्तांसह करनिर्धारक संकलक, प्रभाग अधिकारी, संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे वेतन अदा करू नये, असा आदेश रवींद्रन यांनी नुकताच दिला होता. मार्च जसजसा जवळ येतो, तसतशी पालिकेची करवसुली मोहीम जोरात सुरू होते. परंतु, जानेवारीत ठरवलेले उद्दिष्ट गाठता न आल्याने एकंदरीतच वार्षिक उद्दिष्टावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यंदाच्या वर्षी महापालिकेने करवसुलीपोटी सुमारे ३५० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत २२३ कोटी २७ लाखांची वसुली केली आहे. मालमत्तांसह उर्वरित उत्पन्नाच्या स्रोतांचीही तीच परिस्थिती आहे. करवसुली थंडावल्याप्रकरणी आयुक्तांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याचा आदेश दिला असताना सोमवारच्या आढावा बैठकीतही त्यांनी करवसुलीची माहिती घेतली. मालमत्तावसुलीचा आढावा घेताना आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना अधिक जोमाने मालमत्ता कराच्या वसुलीचे आदेश दिले. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करा, नळजोडण्याही खंडित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)